राहुरी | नगर सह्याद्री
प्रस्तावित शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे सुपीक आणि बागायती शेतीचे नुकसान होईल, असा कोणताही रेल्वेमार्ग स्वीकारला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असेल तोपर्यंत कायदेशीर प्रशासकीय आणि लोकशाही मार्गाने लढा सुरू राहील, असा निर्धार आ.प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या राहुरी आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्नांवर सोमवारी उंबरे येथे आयोजित बैठकीत आ.तनपुरे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली.
रेल्वेमार्गासाठी विद्यमान आराखड्यामुळे होणारे संभाव्य नुकसान तसेच दाखल करण्यात आलेल्या हरकती, औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेली जनहित याचिका तसेच पुढील कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली
आमदार तनपुरे यांनी सुरुवातीपासूनच रेल्वे आराखड्याला विरोध दाखविला असून, सुपीक शेती व शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना केली. बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. रेल्वेमार्गाचा आराखडा बदलून शेतीचे नुकसान टाळणारा पर्यायी मार्ग करावा, अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला राहुरी व नेवासा तालुक्यातील बाधित होणारे शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.










