- जाहिरात -spot_img
breaking news

ISRO मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; तपासात मोठा खुलासा! वाचा सविस्तर..

नवी दिल्ली / नगर सह्याद्री –
भारताची प्रतिष्ठित अंतराळ संस्था ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’च्या बंगळुरू येथील मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. दिल्ली आणि बंगळुरू पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून निशांत त्यागी (वय ३६) नावाच्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या आरोपीने केवळ इस्रोच नव्हे, तर देशातील अनेक उच्च सुरक्षा संस्था आणि एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानालाही अशाच धमक्या दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

गुरुवारी इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या कार्यालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले. बंगळुरू पोलीस, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. सुदैवाने, या तपासणीत कोणतीही स्फोटक वस्तू आढळली नाही आणि ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. बंगळुरूचे संजय नगर पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

२९ जूनच्या ‘त्या’ ईमेलचा डिजिटल ट्रेल आणि अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निशांत त्यागी याने २९ जून रोजी देशातील अनेक संवेदनशील संस्थांना ईमेल पाठवले होते. पोलिसांनी ईमेलच्या ‘डिजिटल ट्रेल’चा माग काढत दोन संशयास्पद ईमेल अकाऊंट्सचे विश्लेषण केले. या अकाऊंट्सशी लिंक असलेला मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला आणि ३० जून रोजी पोलिसांनी गाझियाबादच्या संयोग नगर येथील त्याच्या घरावर छापा टाकून त्याला पकडले.

एअर इंडियाचे न्यूयॉर्क विमान आणि ‘या’ संस्था होत्या निशाण्यावर
आरोपीने केवळ इस्रोलाच नाही, तर देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या संस्थांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. यामध्ये एनआयए, डीआरडीओ, एनपीसीआयएल, नागरी उड्डाण मंत्रायल आणि नवी दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला देखील त्याने बॉम्बची धमकी दिली होती.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, ३६ वर्षीय आरोपी निशांत त्यागी हा २००८ पासून गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर विविध वैद्यकीय संस्थांमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबीयांनीही पोलिसांना त्याच्या वैद्यकीय इतिहासाचे दस्तऐवज सादर केले आहेत. त्याने ओपन स्कूलिंगमधून शालेय शिक्षण पूर्ण केले होते आणि २०१० मध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला होता, मात्र तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. त्याच्या घराची झडती घेतली असता कोणतेही स्फोटक साहित्य पोलिसांना मिळालेले नाही.

हे सुद्धा वाचा :  मालमत्ता नोंदणीतून मनपाला सव्वापाच कोटींचा महसूल; ३४२० मालमत्ताधारकांनी १ टक्का शुल्क भरून केली नोंदणी: आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ