‘सिंघम’च्या अपेक्षांवर विनोद पाटील कितपत खरे उतरतात?
अर्जुन बढे | नगर सह्याद्री
शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या बदलीनंतर पाटील यांच्याकडे शिरूर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सन 1996 मध्ये पोलीस सेवेत दाखल झालेले विनोद पाटील हे अनुभवी अधिकारी असून त्यांनी मुंबईमध्ये तब्बल 21 वर्षांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सुमारे आठ महिन्यांपूव त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली झाली होती. आता शिरूरसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची धुरा त्यांच्या हाती आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, महिला सुरक्षेला प्राधान्य देणे, रोडरोमिओंवर कारवाई करणे आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण करणे या बाबींना विशेष महत्त्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या घोषणा प्रत्यक्षात कितपत उतरतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिरूर शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी, एमडीसह विविध अमली पदार्थांचा वाढता विळखा, युवकांमध्ये वाढणारे व्यसन, बेकायदेशीर धंदे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणारे वाहनचालक, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरच्या बुलेट मोटारसायकली, काळ्या काचा लावलेली वाहने तसेच राजचिन्ह, आमदार-खासदार किंवा विविध पदांची अनधिकृत स्टिकर्स लावून फिरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
विशेष म्हणजे, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके यांनी नुकत्याच झालेल्या जनता दरबारात तुमच्या मनातील सिंघम मी शिरूरकरांना देणार आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या पोलीस निरीक्षकांकडून नागरिकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. कायद्याचे राज्य प्रस्थापित करत गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारा, सामान्य नागरिकांना दिलासा देणारा आणि तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रभावी मोहीम उभारणारा अधिकारी म्हणून विनोद पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
मात्र, केवळ पदभार स्वीकारून चालणार नाही तर खाकीचा धाक पुन्हा निर्माण करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे, अमली पदार्थांच्या रॅकेटवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणे हे त्यांच्यासमोरील खरे आव्हान असणार आहे.
शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा खाकीच्या धाकात राहणार का? आमदार आबा कटके यांनी व्यक्त केलेल्या ‘सिंघम’च्या अपेक्षांवर विनोद पाटील कितपत खरे उतरतात? याचे उत्तर येणाऱ्या काळात त्यांच्या कामगिरीतूनच मिळणार आहे. सध्या तरी संपूर्ण तालुक्याच्या नजरा नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीकडे लागल्या आहेत.










