दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीला लाथ मारून दागिने आणि रोख रक्कम पळवली
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहरे गावाजवळ एक खळबळजनक लुटीची घटना समोर आली आहे. भाजीपाला विक्री करून स्कुटीवरून घरी परतणाऱ्या संगीता बाळासाहेब शिंदे (वय ४८) या महिला भाजी विक्रेत्याला दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने लुटल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दिनांक ४ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपली भाजी विक्री संपवून उरलेला भाजीपाला घेऊन स्कुटीवरून देहरे येथील आपल्या घराकडे निघाल्या होत्या. देहरे गावातील वडार स्मशानभूमीजवळील वनीकरण विभागाच्या रस्त्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या चालत्या स्कुटीला जोरात लाथ मारली. यामुळे महिला रस्त्यावर पडताच चोरट्यांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली.
या लुटीमध्ये ४५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार रुपयांचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले झुमके, १० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि बाजारात भाजी विकून आलेली ४ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेनंतर संगीता शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आ
तोफखाना पोलीस स्टेशन आवारात दारू पिऊन गोंधळ घालणारा गजाआड; केडगावच्या आरोपीवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर : स्थानिक तोफखाना पोलीस स्टेशनच्या आवारातच मद्यप्राशन करून जोरदार आरडाओरडा आणि शिवीगाळ करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाजी बाबासाहेब मुळे (वय ५५ वर्षे, राहणार शाहू नगर, केडगाव, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक बडे यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी संभाजी मुळे हा दारूच्या नशेत तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आला. त्याने तिथे उपस्थित नागरिकांना आणि पोलिसांना उद्देशून मोठ्या आवाजात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला शांत राहण्याचा इशारा दिला, परंतु त्याने अधिकच आक्रमक होत शिवीगाळ सुरू ठेवली. पोलीस स्टेशनच्या आवारातच भर रात्री अशा पद्धतीने गोंधळ घातल्यामुळे तेथील सार्वजनिक शांतता पूर्णपणे धोक्यात आली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
रविवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५ (१) नुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे करत असून, प्रभारी पोलीस अधिकारी बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.
रस्ता कामावरून वाद; जातीवाचक शिवीगाळ करत चौघांनी दिली जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर :बोल्हेगाव परिसरातील सनीधाम येथील साईरत्न रो-हौसिंग सोसायटीमध्ये मनपाने मंजूर केलेल्या रस्त्याचे काम लोकवर्गणीतून सुरू असताना, शेजाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत काम बंद पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सोसायटीमधील रस्त्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी निकाल देऊन अतिक्रमण विभागाला रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाने कारवाई करत रस्ता रिकामा केला होता. त्यानंतर सोसायटीतील नागरिक स्वखर्चाने डंपरद्वारे मुरुम टाकून रस्त्याचे काम करत होते.
या दरम्यान शेजारी राहणारे बबन कृष्णाजी कळमकर, दत्ता बबन कळमकर, पवन बबन कळमकर आणि मच्छिंद्र कळमकर हे सर्व तेथे आले. त्यांनी चालू कामाला अडथळा निर्माण केला. सोसायटीतील एका महिलेने त्यांना मनपा आयुक्तांच्या आदेशाची माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्या महिलेला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली व अपमान केला.
या घटनेच्या वेळी कॉलनीतील इतर नागरिकांनी आरोपींना समजावण्याचा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी शांत न होता उपस्थित सर्व लोकांना वाईट शब्दांत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच रस्त्याच्या कामात ट्रॅक्टर आडवा लावून चाललेले काम बळजबरीने बंद पाडले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बबन कळमकर, दत्ता कळमकर, पवन कळमकर आणि मच्छिंद्र कळमकर यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे करत आहेत.










