पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका, १६ जणांवर गुन्हा दाखल | नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
पाथर्डी | नगर सह्याद्री-
सामूहिक अत्याचार, मारहाण व चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आलेल्या महिलेने पाथर्डी पोलिसांकडून फिर्याद नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप करत मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. याचवेळी सोबत आलेले विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय ४५, रा. आखेगाव, ता. शेवगाव) हे पाथर्डी पोलिस ठाण्याच्या दारातच अचानक कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तसेच उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत गोंधळ घातला.
दरम्यान, रुग्णालयात आक्रोश सुरू असतानाच संबंधित महिला बेशुद्ध पडली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मनीषा खेडकर व कर्मचार्यांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरू केले. घटनेनंतर शहरातील नागरिक व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले होते. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. महिलेच्या फिर्यादीवरून औरंगपूर येथील दिनकर गंगाधर किलबिले, प्रभाकर सुधाकर किलबिले, कृष्णा सुधाकर किलबिले, सारंगधर उत्तम किलबिले, अमोल मच्छिंद्र कोठे, निखिल माने, जयदत्त उत्तम किलबिले, अभिषेक दिलीप किलबिले, दिलीप तुकाराम किलबिले, भीमराव ज्ञानदेव किलबिले, ईश्वर बापूसाहेब देशमुख, सुभाष गोविंद किलबिले, आनंद भाऊसाहेब कासूळे, मनीषा सुधाकर किलबिले व तिचे वडील अशा एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला असून, इतरांनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. तसेच घराच्या बांधकामासाठी ठेवलेले सुमारे तीन लाख रुपये चोरी केल्याचेही नमूद आहे.या प्रकरणात काही आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही होत असून संपूर्ण घटनेचा सखोल तपास वरिष्ठ अधिकार्यांकडून करण्याची मागणी होत आहे.
रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूनंतर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. आमच्या व्यक्तीचा मृत्यू पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाला, असा ठपका ठेवत वरिष्ठ पोलिस अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे रुग्णालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.










