संगमनेर | नगर सह्याद्री
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई सुरू असताना संगमनेर तालुक्यात अद्यापही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे.
संगमनेरमधील अनेक हॉटेल्समध्ये भेसळयुक्त पनीरचा वापर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तसेच चायनीज खाद्यपदार्थ व अन्य जेवणामध्ये आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर होत असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे. अन्नधान्य, कडधान्य, खाद्यतेल तसेच दुग्धजन्य पदार्थांमध्येही भेसळ करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय आईस्क्रीम, बेकरी आणि मिठाई व्यवसायात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचे सांगत, दूध, पनीर आणि खवा यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. बाहेरील राज्यांतील काही व्यावसायिक संगमनेरमध्ये मोठे व्यवसाय उभारून लाखो रुपयांची उलाढाल करत असताना त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्हास्तरीय अधिकारी याबाबत गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करत भेसळ करणाऱ्या सर्व हॉटेल्स, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते आणि संबंधित व्यावसायिक आस्थापनांची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमर कतारी यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी देऊ नये. तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने अद्याप भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कोणतीही मोठी कारवाई केल्याचे समोर आले नसल्याने नागरिकांमध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख फैसल सय्यद, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे, विधानसभाप्रमुख योगेश खेमनर, व्यापारी आघाडीप्रमुख संभव लोढा, इम्तियाज शेख, वाहतूकसेनाप्रमुख अशोक बढे, मघाडे, मोरे, अमोल डुकरे, प्रकाश गायकवाड, अमित फटांगरे, उपजिल्हाप्रमुख रंगनाथ फटांगरे, जिल्हा संघटक पप्पूशेठ कानकाटे यांनी केली.










