आमदार दातेंच्या मागणीनुसार मंत्रालयात आढावा बैठक
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सिंचन व कालवा विकास कामांना गती देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आमदार दाते यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मतदारसंघातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री महोदयांनी मंत्रालयात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रत्येक कामाचा सविस्तर आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी जलसंपदा विभाग सचिव एकनाथ डवले, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, कार्यकारी संचालक धुमाळ साहेब, मुख्य अभियंता चोपडे , अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, कार्यकारी अभियंता बरकले आदी अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत पिंपळगाव जोगा डावा कालवा अस्तरीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जुन्नर तालुक्यातील कालवा दुरुस्ती तसेच पारनेर तालुक्यातील कि.मी. 47 ते 73 या लांबीच्या नव्या लाइनिंग प्रस्तावाची सद्यस्थिती तपासण्यात आली. दोन्ही प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पारनेर हद्दीतील अस्तरीकरणाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने संबंधित कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी संचालकांना दिले.
पिंपळगाव जोगा डावा कालवा-शिवडोह या महत्त्वाच्या कामाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या कामासाठी पुढील पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देत आवश्यक असल्यास कायदा व सुव्यवस्थेची मदत घेऊन काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.पठार भागातील पुणेवाडी, राळेगणसिद्धी आणि जातेगाव येथील उपसा सिंचन योजनांबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या योजनांसाठी पाणी उपलब्धतेचा दाखला मिळावा म्हणून प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला असून, पाणी उपलब्धतेचा अहवाल प्राप्त होताच सर्वेक्षण व पुढील प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे ठरविण्यात आले.गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत पिंपळगाव रोठा, वनकुटे आणि मांडवे खुर्द येथील लिफ्ट सिंचन योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यासाठी यापूवच कार्यादेश देण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र पाणी उपलब्धतेचा अंतिम अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याने तो मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया व प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
तांबडीकार, निमदरी, मोरवाडी आणि वारणवाडी येथील साठवण तलाव योजनांबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या योजनांसाठी आवश्यक पाणी उपलब्धतेचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असून संबंधित विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वेक्षण व पुढील काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.मांडओहळ कालवा अस्तरीकरणाच्या प्रस्तावाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या कामाचा अंतिम प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून प्रशासकीय मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीत आमदार दाते यांनी प्रत्येक कामाचा बारकाईने पाठपुरावा करत मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी मंत्री महोदयांसमोर प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचन योजनांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना
सिंचन प्रकल्पांबाबत आमदार दाते यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही आढावा बैठक आयोजित करण्यासाठी विशेष आग्रह धरला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेणे शक्य झाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी दाखवलेली तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे. शासन त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असून, संबंधित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
– राधाकृष्ण विखे पाटील,जलसंपदा मंत्री










