- जाहिरात -spot_img
breaking news

बनावट कागदपत्रांद्वारे ट्रस्टवर कब्जा!; डॉ. राकेश गांधी यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील एका नामांकित धर्मादाय संस्थेच्या कार्यकारी मंडळावर बनावट कागदपत्रे व खोट्या नोटरीच्या आधारे बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. राकेश गांधी, त्याची पत्नी व इतराविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ. राकेश कांतीलाल गांधी, राजश्री राकेश गांधी (दोघे रा. प्लॅट नंबर 1, महादेव अपार्टमेंट, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर), मोहित कांतीलाल बोरा (रा. शिल्पा अपार्टमेंट, नगर-पुणे रोड, अहिल्यानगर) व इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत शहरातील उद्योजक तथा ट्रस्टचे सचिव अमित रसिकलाल कोठारी (वय ४५, रा.अहिल्यानगर ) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सावेडी येथील पाईपलाईन रोडवरील महादेव अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर 1 मध्ये ‘रेज फाऊंडेशन’ या धर्मादाय संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे. फिर्यादी अमित कोठारी हे सचिव असून त्यांची पत्नी सौ. श्वेता कोठारी याही संस्थेच्या सदस्य आहेत. फिर्यादीचे दिवंगत वडील रसिक चंदूलाल कोठारी हे संस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे १८ जून २०२३ रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये फिर्यादी एचडीएफसी बँकेत गेले असता, वडिलांच्या नावावरील खाती व इतर आर्थिक व्यवहारांची माहिती घेताना त्यांना धक्कादायक बाब समोर आली. रेज फाऊंडेशनच्या नावे एचडीएफसी बँकेत खाते असून, त्या खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व कर्जाची उचल झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत सखोल चौकशी केली असता, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. योगेश बाफना यांच्याकडून संस्थेचा अजेंडा बुक व प्रोसिडिंग बुक मागवण्यात आले. या तपासणीत असे आढळले की, ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढल्याचे व २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभा झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अशा कोणत्याही सभा झाल्याच नव्हत्या, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या तथाकथित सभांना कोणतीही नोटीस, सूचना वा माहिती संस्थेच्या सदस्यांना देण्यात आली नव्हती. तरीही फिर्यादी व त्यांच्या पत्नीने सभेस उपस्थित राहून सह्या केल्याचे बनावट रजिस्टरवर दाखवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या बनावट कागदपत्रांआधारे डॉ. राकेश कांतीलाल गांधी व त्यांची पत्नी सौ. राजश्री राकेश गांधी यांची संस्थेच्या पदावर निवड झाल्याचे भासवण्यात आले.

हे सुद्धा वाचा :  ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून व्यापक पर्यावरण चळवळ उभी करा - डॉ. विखे पाटील

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित कागदपत्रांवर अ‍ॅड. जे. डी. कुसमोडे या नोटरीचे शिक्के व सह्या वापरण्यात आल्या होत्या. मात्र फिर्यादीने अहमदनगर विभागाच्या धर्मादाय उपायुक्तांकडे चेंज रिपोर्ट पडताळणी केली असता, संबंधित नोटरींनी अशी कोणतीही नोंद आपल्या नोटरी रजिस्टरमध्ये केली नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत फिर्यादीने केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या नोटरी सेलकडे तक्रार केली असता, चौकशीअंती २२ डिसेंबर २०२५ रोजी अ‍ॅड. कुसमोडे यांची नोटरी सनदच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. मोहित कांतीलाल बोरा या एजंटामार्फत ही बनावट सही व शिक्का मिळवण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तारखांमधील विसंगतीही उघड झाली. फेब्रुवारी २०२२ मधील कथित सभांची कागदपत्रे प्रत्यक्षात ऑगस्ट २०२२ नंतर तयार करण्यात आल्याचे तसेच नोटरी एक्सप्रायरीच्या तारखेवरूनही स्पष्ट झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. राकेश गांधी, त्यांची पत्नी राजश्री गांधी, मोहित बोरा व इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण या करीत आहेत.

पूर्वी बनावट कर्ज प्रकरण, आता बनावट ‘कब्जा’!
डॉक्टर राकेश कांतीलाल गांधी याने डॉक्टर आशिष भंडारी व इतरांच्या मदतीने एचडीएफसी बँकेत साडेआठ कोटी रुपयांचे बनावट कर्ज मंजूर केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना ताजी असतानाच आता डॉक्टर राकेश गांधी यांनी पत्नी व इतरांच्या मदतीने धर्मादाय संस्थेची न झालेली मीटिंग प्रत्यक्ष झाल्याची दाखवून बनावट प्रोसिडिंग बुक व कागदपत्रे तयार करून ट्रस्टचे अध्यक्ष पद मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ