नाशिक / नगर सह्याद्री –
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या एक एक काळ्या कृत्याचा पर्दाफाश होऊ लागला आहे. खरातच्या कृत्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे. एसआयटीने या प्रकरणात वेगाने तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेने अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न देखील सांगितला आहे. खरातने १०० हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. या नराधमाने कोट्यवधींची माया कमावली होती. त्याचे नाशिक, अहिल्यानगरमध्ये मालमत्ता होती. या तक्रारीतून अशोक खरातच्या काळया कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे.
तक्रारीनुसार, ‘मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा’, असं अशोक खरात पीडित महिलेला बोलायचा. महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात कानाजवळ पुतपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कवडवट -खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि लागलीच स्पर्श करायला सुरुवात करायचा’.
महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली कॅबिन बाहेर ठेवायचा. महिलांना गुंगी आल्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण सुरू करायचा. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. सध्या लैंगिक शोषणाच्या आरोपात कॅप्टन खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे. १०० हून अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती आहे. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय, कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा, अशीही माहिती समोर आली आहे.
नेमके प्रकरण काय? फिर्यादीत काय म्हटले?
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला.
त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कोण आहे कॅप्टन अशोक खरात?
अशोक खरात हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेवेत होता. २२ वर्षे सेवा बजावल्यानंतर तो निवृत्त झाला. त्याने १५४ देशांमध्ये प्रवास केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी खरात, तर सदस्यांमध्ये रूपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीनंतर अंक शास्त्र अन् ज्योतिषी म्हणून व्यवसाय सुरू केला. राज्यातील मोठे मंत्री खरातकडे ‘भविष्य’ जाणून घेण्यासाठी येऊ लागल्याने सर्वत्र तो चर्चेत आला. खासगी विमानाने प्रवास करण्यापासून त्याची ‘लॅव्हिश लाइफस्टाइल’ अनेकांना चक्रावून टाकणारी होती.
कॅप्टन खरातच्या कुकर्माचा पेटारा उघडला, 100 पेक्षा जास्त व्हिडीओ
महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या व्हिडिओंमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुमारे दीड तास आढावा बैठक घेतली. या SIT मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे 100 हुन अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड जप्त
दरम्यान, पोलिसांनी कॅप्टन खरातच्या विविध ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. झाडाझडतीदरम्यान दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. जरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या घडामोडींमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे.










