आमदार कर्डिले व आमदार तनपुरे यांनी लक्ष घालण्याची मागणी
राहुरी | नगर सह्याद्री
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामांच्या सुमारे 50 कोटींच्या निविदा बुधवारी खुल्या झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.सर्वसाधारणपणे शासकीय कामाच्या निविदा 20 ते 30 टक्के कमी दराने मंजूर होण्याची प्रथा असताना विद्यापीठातील कोट्यावधी रुपयांचा निविदा अंदाजित किंमती एवढ्या (समान दराने) खुल्या झाल्याने ठेकेदार व बांधकाम क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठाच्या धुळे, कोल्हापूर, पुणे, राहुरी आणि मांजरी येथील विविध बांधकामासाठी प्रसिद्ध झालेल्या सहा निविदा बुधवारी उघडण्यात आल्या. निविदा उघडल्यानंतरच सर्व कामे एका ठराविक ठेकेदाराने वेगवेगळ्या कंपन्यांना अथवा नावाच्या माध्यमातून मिळवल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात दिवसभर रंगली. या चर्चेची अधिकृत पुष्टी झाली नसली तरी त्यामुळे संपूर्ण निविद्या प्रक्रियेबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
सत्तेत असलेले विधानसभेचे आमदार अक्षय कर्डिले व विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरीत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठात स्थानिक ठेकेदारांच्या अनेक समस्या आहेत. बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी मजतल्या लोकांना सहकार्य करत असल्याचा आरोप होत आहे. आ. अक्षय कर्डिले व आ. प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निविदा प्रक्रियेबाबत 17 जुलै रोजी होणाऱ्या सिनेट बैठकीत सविस्तर माहिती घेणार आहे. निविदा प्रक्रिया नियमानुसार झाली आहे का याची पडताळणी केली जाईल
-आमदार हेमंत ओगले, कार्यकारी परिषद सदस्य










