16 मे ते 14 जूनदरम्यान पहिला टप्पा
जामखेड | नगर सह्याद्री
आगामी 2027 च्या राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देशातील पहिल्याच डिजिटल जनगणनेसाठी जामखेड तहसील प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील 226 प्रगणक व 39 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे कर्मचारी प्रत्यक्ष फील्डवर उतरून घराघरांत माहिती संकलनाचे काम करीत आहेत.
राज्यभर दि. 16 मे ते 14 जूनदरम्यान जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणना मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रगणकांकडून क्षेत्राचे सीमांकन, घरांना क्रमांक देणे, नकाशे तयार करणे आणि घरांची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.
यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत असून, प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती नोंदविली जाणार आहे. त्यामुळे कागदी अर्जांची पद्धत बंद होणार असून, माहिती संकलन अधिक जलद व अचूक होण्यास मदत होणार आहे.
पहिल्या टप्प्यात घराचे स्वरूप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज, शौचालय, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, इंटरनेट सुविधा, मालमत्ता यांसह 33 प्रश्नांच्या आधारे माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. तहसील प्रशासनाकडून नियुक्त सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना डिजिटल प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोबाईल ॲपचा वापर, माहिती नोंदणी व डेटा हाताळणीबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, जनगणना कर्मचारी घरभेटीदरम्यान विचारण्यात येणारी माहिती नागरिकांनी अचूकपणे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी कर्मचाऱ्यांना अचूक माहिती द्यावी
जनगणना ही देशाच्या विकासाचे धोरण ठरवण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. तालुक्यातील नागरिकांनी अधिकृत कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे.
– धनंजय बांगर, तहसीलदार, जामखेड
घरोघरी भेटी देऊन माहिती संकलनास सुरुवात
जामखेड तालुक्यात डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली असून, तालुक्यातील जवळा येथे प्रगणकांकडून घरोघरी भेटी देत माहिती गोळा केली जात आहे. प्रत्येक घराला क्रमांक देणे, घराचे स्वरूप, पाणी, वीज, शौचालय, इंधन आदी सुविधांची माहिती मोबाईल ॲपमध्ये ऑनलाइन नोंदविली जात आहे.










