संघटनात्मक फेरबदलाचे संकेत; तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांची माहिती
पारनेर | नगर सह्याद्री
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) मोठी उलथापालथ झाली आहे. पक्ष संघटनेची नव्याने पुनर्बांधणी करण्यासाठी आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी तालुयातील विविध विभागांसह संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष आणि खासदार नीलेश लंके यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे तरटे यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेप्रसंगी शिक्षक नेते व बाजार समितीचे संचालक रा.या.औटी, माजी सभापती किसनराव रासकर आणि काँग्रेसचे नेते शिवाजीराव जाधव उपस्थित होते.
या निर्णयांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका व शहर कार्यकारिणीसह युवक, महिला, किसान सेल, डॉटर सेल, विधी सेल, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, अपंग सेल आणि सांस्कृतिक सेल अशा सर्वच विभागांचे अध्यक्ष व त्यांच्या समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. येणार्या निवडणुकांच्या काळात पक्ष अधिक आक्रमकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पाऊले उचलली जात आहेत.
संघटनेला बळकटी देण्यासाठी लवकरच खासदार लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुयातील जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करून संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. याच नियोजित बैठकांमध्ये पक्षाच्या नवीन तालुका कार्यकारिणीसह विविध विभागांच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही बाबासाहेब तरटे यांनी दिली. या निर्णयामुळे आता नवीन कार्यकारिणीत कोणाला संधी मिळते, याकडे संपूर्ण तालुयाचे लक्ष लागले आहे.
घाडगे यांना मिळणार राज्यस्तरावर काम करण्याची संधी
पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त झाल्याने महिला तालुकाध्यक्षपदासाठी आता नवीन चेहर्याचा शोध सुरू झाला आहे. सुवर्णाताई धाडगे यांनी गेली २० वर्षे या पदावर आक्रमकपणे काम करत पक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा विचार करता, त्यांना आता जिल्हा किंवा राज्य स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शयता आहे. धाडगे यांच्या जागी तालुयातील दुसर्या फळीतील महिला नेतृत्वाला संधी देऊन पक्ष संघटना अधिक विस्तारण्यावर वरिष्ठ नेतृत्वाचा भर राहू शकतो.
कार्यकाळात राष्ट्रवादीला निवडणुकीत यश
आठ वर्षांपूर्वी २०१८ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर सलग १५ वर्षे हुलकावणी देणारी आमदारकी पक्षाकडे आली. तत्कालिन आमदार व विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँकेचे संचालक पद यासह विविध निवडणुकांमध्ये यश मिळवले, याचे निश्चितच समाधान आहे.
-बाबासाहेब तरटे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस










