नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या बेफाम लाठीचार्जवरून राज ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती करण्याच्या पद्धतीवरून आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे,” असा टोला लगावत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’ सोडून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा
राज ठाकरे म्हणाले की, “केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज पाहता, सरकार रास्त मागण्यांची आंदोलने चिरडण्यात धन्यता मानत आहे.”
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत त्यांनी विचारले, “धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले आहेत, ज्यांचा राजीनामा घेणे हे सरकारला स्वतःचे अपयश वाटत आहे?” पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान ‘परीक्षा पे चर्चा’ करतात ना, मग आता त्यांनी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करावी. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा ‘ईगो’ (अहंकार) यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे.”
ईव्हीएम आणि यंत्रणांच्या जोरावर निवडून येणारे सरकार
सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना राज ठाकरे म्हणाले, “आम्ही काय करायचे हे कोणी सांगायचे नाही. ना विरोधी पक्षांनी, ना जनतेने; कारण ‘तुमच्या मतांवर आम्ही थोडीच निवडून येतो, आम्ही यंत्रणा आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून येतो’ अशीच सत्ताधाऱ्यांची भावना झाली आहे.”
हा आक्रोश केवळ एका परीक्षेपुरता नाही
विद्यार्थ्यांच्या या संघर्षाचे कौतुक करताना त्यांनी जागतिक उदाहरणे दिली. “श्रीलंका (२०२२), अरब स्प्रिंग (२०११) किंवा नेपाळमधील आंदोलने ही विद्यार्थ्यांच्या असंतोषातूनच उभी राहिली होती. जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनाचा पायाही विद्यार्थ्यांचा असंतोषच होता. हे आंदोलन फक्त एका परीक्षेपुरते मर्यादित नसून; महागाई, कंत्राटदारशाही, एकाच उद्योगपतीचे भले करणे आणि शहरांचा होत असलेला गुदमरलेला विकास याविरुद्ध जनतेच्या मनात असलेल्या एकूणच नैराश्याचा हा उद्रेक आहे,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मनसेचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा
NEET सारख्या परीक्षांना मनसेने सुरुवातीपासूनच विरोध केला असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, “अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आलीच पाहिजे. आंदोलने निर्दयीपणे चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर ती सामंजस्याने सोडवण्यात खरी बुद्धिमत्ता आणि मोठेपणा असतो. मनसेचा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे.”










