लुटमारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अहिल्यानगर / पांढरीपुल व इमामपूर घाट परिसरात वाढलेल्या मंगळसूत्र चोरी व लुटमार प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनांवर आळा घालण्यासाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 19 मार्च रोजी पांढरीपुल येथे ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, इमामपूर घाटाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत मंगळसूत्र चोरी व लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातही चोरीचे प्रमाण वाढले असून, विशेषतः महिलांना लक्ष्य करून गुन्हेगारांकडून हल्ले केले जात आहेत. सोन्याचे दर गगनाला भिडल्याने चोरट्यांनी मंगळसूत्र चोरीकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे दिसून येत आहे.
यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक महिला घराबाहेर पडताना भीतीच्या छायेत वावरत असल्याचे चित्र आहे. काही नागरिक पोलिसांच्या प्रक्रियेच्या भीतीने तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल अधिक वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात घडलेल्या एका घटनेने परिसरात खळबळ उडाली. पांढरीपुल येथील हॉटेल व्यावसायिक मिलिंद भवार हे आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या कार्यक्रमावरून परतत असताना, इमामपूर घाटात रात्री सुमारे 9.30 वाजता अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून लुटमार केली. या घटनेनंतरही आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भवार कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतरही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही गुन्हेगारांना पकडण्यात अपयश येत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढले असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
छावा संघटनेने या प्रकरणांचा तपास तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करावा, तसेच अहिल्यानगरमधील सर्व सराफ व्यावसायिकांच्या नोंदवहीची स्वतंत्र तपासणी करून चोरीच्या सोन्याचा मागोवा घ्यावा, अशी मागणी केली आहे.










