दोन साथीदारानंतर मुख्य आरोपीलाही बेड्या
पारनेर | नगर सह्याद्री
बौद्धिक दिव्यांग मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून एका शेतकरी कुटुंबाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी मुख्य आरोपी भोंदू बाबा राजू बन्सी दिवटे याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.
पीडित महिला ही एका शेतकरी कुटुंबातील असून तिचा मुलगा बौद्धिक दिव्यांग आहे. वैद्यकीय उपचार करूनही मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, तसेच शेतीत पिके येत नव्हती, डोक्यावरील कर्ज फिटत नव्हते आणि भावाचे लग्नही जमत नव्हते. याच अडचणींचा गैरफायदा घेत आरोपी राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा अविनाश तरटे (सर्व रा. म्हसणे, ता. पारनेर) यांनी कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढले. संकट दूर करण्याचे सांगून त्यांनी कुटुंबाकडून साडेसहा लाख रुपये उकळले. या दरम्यान, मुलाला देवी मारण्याची भीती दाखवून मुख्य आरोपीने पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला.
हा जाच असह्य झाल्याने शेवटी पीडितेने आपल्या सासू-सासऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी धीर दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर आला. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच त्वरित कारवाई करत दुसऱ्याच दिवशी भोंदू बाबाचा मुलगा शशिकांत आणि महिला सहकारी शोभा तरटे यांना अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी राजू दिवटे घटना घडल्यापासून फरार होता. त्याच्याकडे मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या.पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत मुख्य आरोपी राजू दिवटे याला शुक्रवारी पहाटे बेड्या ठोकल्या. त्याला पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.










