- जाहिरात -spot_img
breaking news

कांद्याला कवडीमोल भाव; रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी केले अनोखे आंदोलन

टाकळी ढोकेश्वर येथे रास्ता रोको, महामार्ग अडवल्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा
पारनेर | नगर सह्याद्री
शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. शेतात रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकर्‍याचा उत्पादन खर्चही निघत नाही. मायबाप सरकारने शेतकर्‍यांच्या या छळाकडे डोळेझाक करू नये. कांद्याला तत्काळ योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे आणि जाचक निर्यातबंदी पूर्णपणे उठवली पाहिजे. सरकारने शेतकर्‍यांच्या या मागण्यांकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात हे आंदोलन उग्र रूप धारण करेल. शेतकरी आता आपल्या हक्कासाठी मागे हटणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी आंदोलनस्थळी दिला.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, १५ मे रोजी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे खासदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनात पारनेर, नगर आणि परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारनेर पोलीस स्टेशनच्या वतीने टाकळी ढोकेश्वर चौकातील रस्ता रोको आंदोलन स्थळावर मोठा पोलीस फौज फाटा बोलवण्यात आला होता. सध्या बाजारात कांद्याला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी असल्याने शेतकर्‍यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, निर्यातबंदी पूर्णपणे हटवण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची तातडीने अंमलबजावणी व्हावी, शेतकर्‍यांची थकीत वीज बिले माफ करण्यात यावीत आणि पीकविम्याचा हक्काचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी महामार्ग अडवून धरला.

या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलन स्थळी राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, जिल्हा प्रवक्ते मोहन रोकडे, महिला नेत्या सोनिया राजदेव, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, शहराध्यक्ष संदीप मते, लखन ठाणगे जालिंदर लंके, विक्रम काळे, विश्वास शेटे, सरपंच शिवाजी निमसे, पोपट गुंड, संदीप ठाणगे, सरपंच अभिजित झावरे, प्रकाश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, भानुदास आग्रे, बाळासाहेब चिकणे, संतोष चिकणे, साहेबराव चिकणे, शिवराम चिकणे, रामभाऊ थोरात, सरपंच बापू ठुबे, आयुब हवलदार, गंगाराम चिकणे, रामदास साळवे, बापू नरड, पोपट नरड, राजेंद्र शेरकर, विकास दगाबाज, जयवंत वाळुंज यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाले होते.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चेचे अनेक प्रयत्न झाले; परंतु मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनावरून मागे न हटण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. अखेर मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; विधानसभेला दगाफटका, निवडणुकीपूर्वीच काय घडलं पहा..

रुग्णवाहिकेला आंदोलकांनी दिली वाट
नगर- कल्याण महामार्गावर कांद्याच्या प्रश्नावर रवींद्र देव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेळी कल्याणकडून नगरच्या दिशेने जाणार्‍या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी तत्काळ जागा उपलब्ध करून दिली.त्यामुळे आंदोलनस्थळी माणुसकीचे दर्शन दिसून आले.

स्थानिक पदाधिकार्‍यांची आंदोलनाकडे पाठ
राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चांगली तयारी केली होती. मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक शेतकरी,राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील असे वाटत असतानाच खासदार लंके गटाचेच जवळचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. टाकळी ढोकेश्वरमधील स्थानिकांनीच आंदोलनाकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळेच आंदोलनाकडे पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली का? अशी चर्चा सुरू होती.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ