आमची दारे कायमची खुली : संजीव भोर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेने (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील काही खासदारही पक्षांतर करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. या चर्चांवर शिवसेना (शिंदे गट) चे प्रवक्ते संजीव भोर यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत, खा.लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू, असे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना संजीव भोर यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांवर भाष्य केले. आजच्या काळात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील, असे चित्र उरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात संवाद आणि संपर्क कायम सुरू असतो. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असतात. काही जण शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, तर काहींच्या राजकीय हालचाली सुरू असतात. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल, याबाबत आधीच निश्चितपणे सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
खा. लंके यांच्याविषयी बोलताना भोर म्हणाले की, लंके यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरू झाली असून, त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत. पक्ष वेगळे झाले तरी वैयक्तिक संबंध कायम राहतात. त्यामुळे त्यांनी भविष्यात शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे मनापासून स्वागत केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना (शिंदे गट) ची भूमिका स्पष्ट करताना भोर यांनी सांगितले की, शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकांसाठी पक्षाची दारे खुली आहेत. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षातून येत असतील, तरी त्यांचे स्वागतच केले जाईल.
खा.लंके यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही
संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. खासदार लंके यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत आता विविध स्तरांवर तर्क-वितर्क सुरू झाले असून, आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, खा.लंके यांनी अद्याप या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.










