अवकाळीचा तडाखा!
ओझर्डे धबधबा उन्हाळ्यात प्रवाहित, पावसाची जोरदार बॅटिंग
मुंबई /नगर सह्याद्री :
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली आहे. सातारा; बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

साताऱ्यातील पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कामरगाव, नेचर आणि गोकुळ हेळवाक या गावांना बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, ज्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्य भिजले आहे. लग्न मंडप पूर्णतः उडून गेल्याने वऱ्हाडी मंडळींची मोठी धांदल उडाली. या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला कोयना परिसरातील ओझर्डे धबधबा प्रवाहित झाला आहे. भर उन्हाळ्यात हा धबधबा वाहण्याची ही पहिलीच वेळ असून पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
बुलढाण्यात पावसाची बॅटिंग
बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार आणि मेहकर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. लोणार तालुक्यात तर आज सकाळी 6 वाजेनंतरही पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना रणरणत्या उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
वाशिममध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस
वाशिम जिल्ह्यात हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सातत्याने होत असलेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असली तरी, उन्हाळी पिकांच्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात काल दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यासह हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात वाळत घातलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कांदा बीज, भुईमूग तसेच आंब्याच्या बागांनाही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.










