आमदार दातेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दिग्गजांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा, मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमादरम्यान पारनेर तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तालुक्यातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री धनंजय मुंडे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांचे उपस्थित प्रवेश संपन्न झाला.या प्रवेशामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, भाळवणी येथील उद्योजक शिवसेना शिंदे गटाचे संदीप रोहोकले, भाजपचे नगरसेवक अशोक चेडे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, शिवसेनेचे उबाठा नगरसेवक नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, भाऊ ठुबे, माऊली औटी, सिद्धेश्वरवाडी माजी सरपंच आप्पासाहेब नरोडे तसेच योगेश दावभट, विकास केरूभाऊ रोहोकले, पवन संजय रोहोकले, उद्धव गुंजाळ, दिलीप विश्वनाथ रोहोकले, संदीप बिबिशन साळुंके, हरिदास रंगनाथ रोहकले, सुनिल बाबाजी चेमटे, मछिंद्र गोपाळा रोहोकले, संतोष भाऊसाहेब रोहकले, दत्ता कृष्णा सुरुसे, राहुल दादाभाऊ गुंजाळ, मनोहर विठ्ठल रोहोकले यासह पारनेर शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील विविध राजकीय प्रवाहांतील प्रभावी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः आगामी नगरपंचायत, ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढली असून, तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाढता जनाधार पक्षाला अधिक बळ देणारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रापवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. पारनेर तालुक्यात आमदार दाते यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेचा दृढ विश्वास संपादन केला जात असल्याचे हे उत्तम उदाहरण असून त्यांच्यावरील विश्वासामुळेच विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत. आगामी काळात हा वाढता जनाधार पक्षाला अधिक बळ देणारा ठरेल, असा मला ठाम विश्वास आहे.
– प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी नेते
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट
आमदार काशिनाथ दाते यांची जनसामान्यांशी असलेली नाळ, विकासकामांबाबतची तळमळ आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज तालुक्यातील नागरिकांमध्ये दाते सरांच्या कामाची सकारात्मक चर्चा असून त्यांच्या नेतृत्वाभोवती विश्वासाचे मजबूत वलय निर्माण झाले आहे. विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या या नेतृत्वासोबत काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून आगामी काळात पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
– संदीप रोहोकले, उद्योजक भाळवणी










