आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
परळी /नगर सहयाद्री
मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं, मात्र मला लाथा मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला अशी खंत आमदार धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली .
नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन उभारणीसाठी परळीत 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे मराठा युवा मंचकडून आमदार धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, ‘छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं ते महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं. मधल्या काळात काही गोष्टी झाल्या त्याची चर्चा आता होऊ नये. मराठ्यांच्या भावनांचा विषय माझ्या दृष्टीने आत्मीयतेचा विषय होता. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मधल्या काही दोन-तीन वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे माझ्यावर उपकार आहेत. मधल्या दोन-तीन वर्षात काय झालं त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही.
मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं आहे. पण मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला. ताकाला जाऊन भांड लपवायचा स्वभाव माझा नाही. डोक्यात आहे ते ओठावर आहे जे ओठावर आहे ते डोक्यात आहे. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करून देणार आहोत. परळीत होत असलेला एग्रीकल्चर कॉलेजचे काम पुढच्या पन्नास वर्षाचा अंदाज घेऊन केले जात आहे, तशाच पद्धतीचे हे मराठा भवन असणार आहे.
याआधी अनेकदा बैठका गार्डनमध्ये घ्यावा लागत होत्या, ते मला बघवत नव्हतं. झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात आंदोलन तात्पुरते असतात, एखाद्या बद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. आज ना उद्या खरं काय ते कळतच. त्यामुळे मी दीड वर्ष शांत होतो. माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियत साफ राहिली तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला आहे तो नियतीच दुरूस्त करून देणार आहे. हे मला माहित आहे म्हणून आज हे सगळं नियतीने घडवला आहे.तालुकास्तरावरील 28 गुंठ्यावर हे पहिलंच मराठा भवन असणार आहे. या वास्तूची एक एक वीट रचण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ही जबाबदारी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं व्यक्त करतो.










