श्रीगोंदा-मांडवगण रोडवरील वाहतूक ठप्प, नागरिकांची गैरसोय
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा-मांडवगण रोडचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाकडून तब्बल 215 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची अंमलबजावणी कृष्णाई इन्फ्रा कंपनीकडून केली जात आहे. दरम्यान, गणपती मळा परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
शनिवारी (दि. 30 मे) गणपती मळा परिसरात खोदकाम सुरू असताना कर्मचाऱ्यांकडून अनवधानाने भूमिगत गॅस पाईपलाईनला धक्का लागला. त्यामुळे गॅस गळती सुरू झाली आणि परिसरात तीव्र वास पसरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने संबंधित यंत्रणा व अग्निशमन दलाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी व तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ उपाययोजना करून गॅस गळती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही.
मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव श्रीगोंदा-मांडवगण मार्गावरील वाहतूक दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बस सेवा पूर्णपणे बंद झाल्याने शालेय विद्याथ, महाविद्यालयीन युवक तसेच नोकरदार वर्गाला ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून रस्ते विकासाच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि भूमिगत सुविधांची अचूक माहिती घेऊनच खोदकाम करावे, तसेच वाहतुक लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










