ग्राहकाला शिवीगाळ, धक्काबुक्की | केडगाव टाटा स्टर्लिंग शोरूममधील प्रकार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नवीन कारची लिक झालेली इंधन टाकी बदलून देण्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला शोरूमच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना अहिल्यानगरमधील केडगाव बायपास परिसरात घडली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात शोरूमचे मॅनेजर मोमीन सर आणि एका अनोळखी कर्मचाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस माहितीनुसार, सिद्धांत सुभाष आंधळे (वय 25, रा. कामरगाव, ता. जि. अहिल्यानगर) यांनी सन 2024 मध्ये केडगाव बायपास येथील टाटा स्टर्लिंग शोरूममधून चारचाकी वाहन खरेदी केले होते. काही दिवसांपूव या वाहनाची इंधन टाकी लिक असल्याचे सिद्धांत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शोरूम प्रशासनाकडे नवीन इंधन टाकी बसवून देण्याची मागणी केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही शोरूमकडून टाकी बदलून दिली जात नव्हती. दरम्यान, 20 जुलै 2026 रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास सिद्धांत आंधळे हे या प्रकरणी विचारणा करण्यासाठी शोरूममध्ये गेले होते. त्यावेळी मॅनेजर मोमीन सर आणि त्यांच्या एका अनोळखी सहकाऱ्याने सिद्धांत यांच्याशी जोरदार वाद घातला. वादादरम्यान त्यांनी सिद्धांत यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. एका अनोळखी कर्मचाऱ्याने स्वतःच्या अंगातील टी-शर्ट काढून मचल आता शोरूमच्या बाहेर, तुला दाखवतोफ अशी जाहीर धमकी देऊन दमदाटी केली.
या घटनेनंतर पीडित सिद्धांत आंधळे यांनी थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.
ग्रामपंचायतला टाळे ठोकणे भोवले
बबन कर्डिले, विजय जगताप यांच्यावर गुन्हा दाखल!
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर: नगर तालुक्यातील जखणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला बेकायदेशीरपणे कुलूप लावून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत अधिकारी राजेश एकनाथ तगरे (वय 47, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) हे 18 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जखणगाव ग्रामपंचायत कार्यालयात आपले दैनंदिन शासकीय काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी बबन रावसाहेब कडले आणि विजय मोहन जगताप (दोघे रा. जखणगाव, ता. जि. अहिल्यानगर) यांनी कोणतेही कारण नसताना ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. कार्यालयाला कुलूप लावल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पडले. त्यामुळे अधिकारी तगरे यांच्या दैनंदिन शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी फिर्यादी राजेश तगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगर तालुका पोलिसांनी 20 जुलै 2026 रोजी आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शरद गणपत दाते करत आहेत.
भिंगारमध्ये घातक शस्त्रासह तरुणाला अटक; कॅम्प पोलिसांची बेलेश्वर मंदिराच्या काटवनात कारवाई
अहिल्यानगर: कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिंगार परिसरात एका तरुणाला बेकायदेशीररीत्या धारदार हत्यार आणि विनानंबर गाडी बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. बेलेश्वर मंदिरामागील काटवनातील मोकळ्या जागेत ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंगार येथील बेलेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या काटवनात एक तरुण संशयितरीत्या थांबल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कॅम्प पोलीस स्टेशनचे अंमलदार प्रमोद लहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी आलमगीर भागातील प्रबुद्धनगर येथे राहणारा अबरार मुक्तार शेख (वय २५) हा तेथे संशयित हालचाली करताना आढळून आला.
पोलिसांनी त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे १५०० रुपये किमतीचा आणि ३३ सेमी लांबीचा धारदार चाकू मिळून आला. तसेच त्याच्या ताब्यात २० हजार रुपये किमतीची लाल रंगाची विनानंबर मोपेड गाडी आढळून आली.
बेकायदेशीररीत्या प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरून अबरार शेख याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.
रिक्षाचालकाचा राडा: महिलेशी गैरवर्तन करून मुलाला दुचाकीसह उडवले
गाडळकर मळा परिसरातील धक्कादायक घटना; आरोपी चालक फरार, गुन्हा दाखल
अहिल्यानगर: रेल्वेस्टेशन परिसरातील विद्या कॉलनी, गाडळकर मळा येथील सुलभ कन्स्ट्रक्शनजवळ एका अनोळखी रिक्षाचालकाने धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना घडली आहे. घराजवळ थांबलेल्या एका महिलेला रिक्षाचालकाने हॉर्न वाजवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व त्रास दिला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने लगेचच आपल्या मुलाला फोन करून मदतीसाठी घटनास्थळी बोलावून घेतले.
महिलेचा मुलगा दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचताच, संतापलेल्या रिक्षाचालकाने त्याच्याकडील रिक्षाने मुलाच्या दुचाकीला अत्यंत वेगात जोरदार धडक दिली. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या शाईन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या गोंधळात आणि धडकेच्या दरम्यान मुलाची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गहाळ झाली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी रिक्षाचालक घटनास्थळावरून रिक्षासह पसार झाला.
घटनेनंतर जखमी मुलाला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मुलावर आवश्यक उपचार पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ शरद वाघ करत आहेत. पोलीस सध्या परिसरातील तपासणी करत असून फरार रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड मारून जीवे मारण्याची धमकी; विळद बायपास परिसरातील घटना
एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रविण नाकाडे विरुद्ध गुन्हा दाखल; राहुल खेडकर जखमी
अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील विळद बायपास येथील संत वामनभाऊ पार्किंग परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एका पसार आरोपीने तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले, तसेच पिकअप गाडीखाली घालून जीवे मारण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील पितळे कॉलनी परिसर रहिवासी राहुल नारायण खेडकर (वय २०) हा तरुण रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास विळद बायपास येथील संत वामनभाऊ पार्किंगजवळ उभा होता. त्यावेळी पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव येथील रहिवासी आरोपी प्रविण रामदास नाकाडे हा दारूच्या नशेत तेथे आला.
पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी प्रविण नाकाडे याने राहुल खेडकर याला विनाकारण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने हातात दगड धरून राहुलच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात राहुल खेडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण केल्यानंतर ‘तुला पिकअप गाडीखाली घालून जीवे मारून टाकतो’ अशी धमकी देऊन आरोपी तेथून पसार झाला.
घटनेनंतर जखमी राहुल खेडकर याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण रामदास नाकाडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
पाण्यात बुडून ४ वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू; बोल्हेगाव परिसरातील घटना
अहिल्यानगर: शहरातील बोल्हेगाव परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्यात बुडाल्यामुळे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. साई विशाल पवार असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील भारत बेकरीजवळील आंबेडकर चौक परिसरात राहणारा साई पवार हा चिमुकला २० जुलै रोजी अचानक पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक विशाल वसंत पवार यांनी त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील इंपल्स रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून साई याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी इंपल्स रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
या माहितीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश मोरे आणि विनोद गंगावणे करत आहेत. लहान मुलाने अचानक प्राण गमावल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










