- जाहिरात -spot_img
breaking news

निळवंडे धरणाबाबतचा पहिला निर्णय हा अजितदादांचाच होता; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

लोणी / नगर सह्याद्री –
सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकासातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरणासाठी मोठे काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि ४८ हजार कोटी रुपयांच्या वीजबिल माफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे. महायुती सरकारने विकासाभिमुख धोरण घेतल्यामुळे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, नगराध्यक्ष सौ.जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, प्रवरा फळे-भाजीपाला संस्थेचे चेअरमन विजयराव लगड, ट्रक्स सोसायटीचे व्हा. चेअरमन सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि विविध योजनांचे लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा आढावा घेऊन, राज्यातील सर्व समाज घटकांसाठी समर्पित भावनेने त्यांचे काम सुरू असल्‍याचे सांगितले. नागपूरचे महापौर ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा विचारांच्या आधारावर यशस्वी झाला. वडील स्व. गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून संघाच्या विचारांचे बाळकडू घेऊन राष्ट्रीय विचारांनी त्यांनी स्वतःचे नेतृत्व घडविले. महायुती सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली आज विकसित महाराष्ट्राची संकल्पना घेऊन पुढे जात आहे, याचा निश्चित अभिमान वाटतो.

हे सुद्धा वाचा :  गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; कुठे घडला प्रकार पहा...

राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. या माध्यमातून जलसंपदा विभागाचे सिंचन प्रकल्पांवर मोठे काम सुरू आहे. गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मिळत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र पाणी परिषदेने तयार केलेले नदीजोड प्रकल्पाचे प्रस्ताव स्वतः फडणवीस यांनी स्व. गणपतराव देशमुख आणि खासदार साहेबांच्या समवेत बसून अनुभवले. आज त्यांचेच स्वप्न महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.

महायुती सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना, किसान सन्मान निधी योजना यांच्या बरोबरीनेच राज्यात कृषी विकासाला नवी दिशा दिली आहे. ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि ४८ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांबरोबरच एकल महिलांनाही मोठ्या संधी मिळू लागल्या आहेत. लाडकी बहीण योजना निवडणूकीपुरती आहे असा खोटा प्रचार विरोधकांकडून करण्‍यात येत होता. परंतू महायुती सरकारने सुरु केलेली एकही योजना बंद झाली नसल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात पानंद रस्ते, गावनकाशे आणि शासनाच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य होत आहे. जिल्ह्यातील साकळाई योजना, कुकडी प्रकल्प, गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचे मोठे काम सुरू असून, सौरऊर्जा प्रकल्पामध्येही आपला जिल्हा प्रथमस्थानी आला असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात या अभियानाच्या आयोजनाचे कौतुक करून, महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांना न्याय देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमुक्ती आणि ऊर्जाक्षेत्रातील सुविधांमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावी पोहोचविणे हा मुख्य उद्देश असून, अशा स्वरूपाची शिबिरे भविष्यातही आयोजित केली जाणार असून, शासन निर्णय आणि योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून भूमी अभिलेख, महसूल, पुरवठा, कृषी, नगरविकास, ग्रामविकास, एकात्मिक बालविकास, आरोग्य, कौशल्य विकास तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध लाभांचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हे सुद्धा वाचा :  MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला तर मुलींमध्ये आरती अव्वल

“स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विकासाचा दृष्टिकोन असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय कठोर परंतु तितकेच संवेदनशील स्वभावाचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अनेकदा काही निर्णयांवरून त्यांच्याशी मतभेद झाले; परंतु विकासामध्ये कटुता येऊ दिली नाही. त्यांच्या समवेतील अनेक आठवणी आज मनामध्ये घर करून असल्याची भावनिकता त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामाला कधीही त्यांनी नकार दिला नाही. निळवंडे धरणाचे श्रेय कोणीही घेवो, प्रकल्पाबाबतचा पहिला निर्णय हा अजितदादांचाच होता.”

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ