अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सकाळी नांदगाव शिवारात देवनदी जवळ जाधव यांच्या शेतामध्ये हवेच्या व पाण्याच्या दाबाने फुटली. पाणी गळती होत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतलेले आहे. त्यामुळे शहराचा पाणी दोन दिवस विस्कळीत होणार असल्याचे महापालिकेने कळविले असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर पाणी पुरवठा योजनेची ११०० एम.एम व्यासाची मुख्य जलवाहिनी हवेच्या व पाण्याच्या दाबाने लिकेज झाली आहे. ११०० एम.एम व्यासाची मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याने व दुरूस्ती कामासाठी सदर जलवाहिनीद्वारे होत असलेला पाणी उपसा बंद ठेवण्यात आल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाया पूर्ण क्षमतेने व निर्धारित वेळेत भरणे शय होणार नाही.त्यामुळे मंगळवारी रोटेशन नुसार पाणी वाटप सुरू असलेल्या बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईप लाईन रोड, ढवणवस्ती परिसर, वैदवाडी इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास बुधवारी ८ एप्रिल रोजी पाणी वाटप करण्यात येईल.
तसेच बुधवारी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर इत्यादी भागास उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.










