पंच कमिटीच्या मध्यस्थीने पवार कुटुंबांत समझोता, सात दिवसांनंतर उपोषण मागे
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील पोखरी येथे गायरान जमिनीच्या ताब्यावरून दोन पवार कुटुंबांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर गावातील पंच कमिटीच्या मध्यस्थीने सामोपचाराने मिटविण्यात आला. या समझोत्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण सात दिवसांनी मागे घेण्यात आले.
पोखरी गावातील गावठाण गट क्रमांक 19 मधील गायरान जमिनीच्या ताब्यावरून दोन पवार कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसान गंभीर गुन्ह्यात झाल्याचा आरोप करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित रावसाहेब कुंडलीक पवार यांनी केली होती. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी कुटुंबीयांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
उपोषण सुरू झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक, पंच कमिटी, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा घडवून आणल्या. अखेर दोन्ही बाजूंनी सामंजस्य भूमिका घेत परस्पर सामोपचाराने वाद मिटविण्याचा निर्णय घेतला. गावातील सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पंच कमिटीने केलेल्या प्रयत्नांना यश आले. दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. समझोता झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मारग, पोलीस अधिकारी किरण भापकर, राजू वैराळ, रवींद्र साठे, सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले, सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार, ज्ञानदेव उर्फ माऊली पवार, माजी उपसरपंच परसराम शेलार, अशोक खैरे, निलेश पवार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.










