- जाहिरात -spot_img
breaking news

पाकिस्तानी गँगस्टरशी संबंध; श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; कोठला परिसरात पोलिसांचा छापा..

श्रीरामपूर | नगर सह्याद्री –
शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित रिल्स पहाणे व त्यावर आक्षेपार्ह स्वरुपाच्या प्रतिक्रीया केल्याच्या संशयावरून शहरातील चार जणांची सखोल चौकशी करुन त्यांना नोटीसाही बजविल्याचे समजते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानातील कथित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित काही व्यक्तींशी श्रीरामपूरमधील काही तरुणांचा संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने शहरातील विविध ठिकाणी नियोजनबद्ध छापेमारी करत संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित करून काही महत्त्वाच्या व्यक्तींबाबत माहिती संकलित करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच काही ठिकाणांची रेकी करण्यात आल्याचा संशयही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या अनुषंगाने जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान संशयितांकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच सोशल मीडिया व्यवहारांशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. या तपासातून आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कोठला परिसरात पोलिसांचा छापा; १ लाख ६६ हजारांचा सुगंधी मावा जप्त
​अहिल्यानगर : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी माव्याची छुप्या पद्धतीने निर्मिती आणि विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाडस कारवाई केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठला येथील बाराईमाम भागात बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी १ लाख ६६ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुरज सुभाष देशमुख यांनी याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

​पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत कोठला भागात सुगंधी मावा तयार केला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसह कोठला येथील एका पत्र्याच्या खोलीवर सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या ठिकाणी एका खोलीत मशीनच्या सहाय्याने सुपारी आणि सुगंधी तंबाखूचे मिश्रण करून मावा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना मिळून आले.
​या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून शाहीद फारुख शेख (वय २५, राहणार बाराईमाम, कोठला, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. आर्थिक फायद्यासाठी हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून ८० हजार रुपयांचे मावा तयार करण्याचे लोखंडी मशीन, ११ हजार रुपयांचा २२ किलो तयार मावा, २४ हजार ७५० रुपयांचा कच्चा मावा, ३७ हजार ८०० रुपयांची सुपारी, सुगंधित तंबाखूचे पाकीट आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण १ लाख ६६ हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा माल जप्त करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवास्तव या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  गुंड चिंग्या मोरेची धिंड; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई; निंबळकचा युवक प्रतिबंधित मावा तयार करताना रंगेहात अटक
​अहिल्यानगर: शहरात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू आणि माव्याची बेकायदेशीर निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी धाडसी छापा टाकला. गुलमोहर रस्त्यावरील आम्रपाली मंगल कार्यालयासमोर एका पत्राच्या खोलीत हा प्रकार सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका युवकाला अटक केली आहे.
​एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शासकीय फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने गुलमोहर रस्त्यावरील संशयास्पद खोलीवर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. त्यावेळी अक्षय राजू पवार (वय १९, रा. निंबळक, ता. जि. अहिल्यानगर) हा तरुण मशीनच्या साहाय्याने सुगंधी मावा तयार करताना रंगेहात सापडला.

​या छाप्यादरम्यान पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्याला घातक असणारा मुद्देमाल आढळला. यामध्ये ७२ हजार रुपये किमतीचे सुगंधी तंबाखूचे २४ मोठे पॅकेट, १५ हजार ३०० रुपयांचे ५१ लहान पॅकेट, ३४ हजार रुपयांचे निळ्या रंगाचे ६८ पॅकेट आणि २४०० रुपयांचे काळ्या रंगाचे १२ पॅकेट जप्त करण्यात आले. तसेच ४ हजार ५०० रुपये किमतीचा ९ किलो तयार मावा, ५ हजार रुपयांची कत्ती सुपारी आणि मावा तयार करण्याची ३५ हजार रुपयांची इलेक्ट्रिक मोटार जोडलेली लोखंडी मशीन असा एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.
​अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून मुद्देमालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी मावा तयार करणे व विकणे यावर कायदेशीर बंदी आहे. हा पदार्थ मानवी शरीराला अत्यंत अपायकारक आहे हे माहीत असतानाही, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो तयार केला जात होता. पोलिसांनी आरोपी अक्षय पवार याला ताब्यात घेतले असून तोफखाना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बोअरवेलच्या मोटारवरून बोल्हेगावात वाद; घरात घुसून मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी
​अहिल्यानगर – सामाईक बोअरवेलच्या मोटारची पिन काढल्याच्या कारणावरून बोल्हेगाव परिसरातील खंडोबा नगर, मोरया पार्क येथे एका कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​महादेव जालिंदर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा शेजारी राहणारे आरोपी बबलू युनुस शेख, त्याची पत्नी मुस्कान बबलू शेख, मुलगा अयान बबलू शेख, पप्पू आणि इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींसोबत वाद झाला. सामाईक बोअरवेलच्या मोटारला लावलेली पिन काढल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला होता. आरोपींनी फिर्यादीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि शिवीगाळ करत फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचे नातेवाईक जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
​जाताना आरोपींनी “जर परत आमच्या नादी लागला तर गोळ्या घालून मारून टाकीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक गोटला करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  राहुरीत अक्षय कर्डिलेच ठरले किंग; कोणाला किती मिळाली मते...

बोल्हेगावात किरकोळ वादातून घरात घुसून मारहाण; जीवे मारण्याची धमकी
​अहिल्यानगर: बोल्हेगाव परिसरातील खंडोबा नगर येथे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला घरात घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घरासमोरील भागाची साफसफाई करून पाण्याची टाकी भरत होती. त्यावेळी आरोपी महिलेने पाण्याची पिन काढली. यावर फिर्यादीने विरोध करत, पिन काढल्यामुळे मुलाला विजेचा धक्का लागू शकतो आणि आम्हाला अजून पाणी भरायचे आहे, असे सांगितले. या किरकोळ कारणाचा राग आल्याने आरोपी महिलेने आपल्या घरातील नातेवाईकांना बोलावून बेकायदेशीर टोळके जमा केले.
​या टोळक्याने थेट फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घरातून जाताना आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला, माझ्याकडे परवाना असलेली बंदूक आहे, तुला त्या बंदुकीने उडवून देईन, अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी व त्यांचा मुलगा दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
​या घटनेनंतर पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी एकूण सहा नामजद आरोपींसह इतर एक ते दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करत आहेत.

केडगाव येथे ओटा धुतल्याच्या कारणावरून एकाला पाईपने बेदम मारहाण
​अहिल्यानगर : घरासमोरील ओटा धुतल्याचे पाणी पुढे आल्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीला स्टीलच्या पाईपने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना केडगाव येथील मोतीनगर भागात घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत गोरक्ष नवले (वय ४६, रा. मोतीनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी नितीन झेंडे, सुमित नितीन झेंडे आणि शुभम नितीन झेंडे (सर्व रा. मोतीनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​फिर्यादी चंद्रकांत नवले यांनी घरासमोरील ओटा धुतल्याने त्याचे पाणी समोर आले होते. याचा राग आल्यामुळे आरोपींनी वाद उकरून काढला. राग अनावर झाल्याने नितीन झेंडे व सुमित झेंडे यांनी नवले यांना स्टीलच्या पाईपने जबर मारहाण केली, तर शुभम झेंडे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ‘इथून पुढे आमच्या नादाला लागला तर जीवेच मारू’, अशी धमकी दिली.
​मारहाणीत जखमी झालेल्या चंद्रकांत नवले यांना तातडीने प्रणव मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लगड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : तालुक्यातील मदडगाव परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यातील एक कुटुंब मदडगाव येथील एका पोल्ट्री फार्मवर कामासाठी आले होते. हे कुटुंब तेथीलच एका भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. या कुटुंबातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी धर्मेंद्र शिवकुमार विश्वकर्मा याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेतला. आरोपीने पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
​हा प्रकार जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान वेळोवेळी घडला असून, अखेर या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र विश्वकर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.

चारचाकीसाठी पाच लाखांची मागणी; अहिल्यानगरमध्ये विवाहितेचा छळ, सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: माहेरहून चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी एका ३४ वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांची मागणी पूर्ण न केल्याने विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव फाटा परिसरात राहणाऱ्या पीडित विवाहितेचा विवाह २००९ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही वर्षे नीट गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. यामध्ये पती शिरीष बाबासाहेब सोनवणे, सासू पुष्पा बाबासाहेब सोनवणे, सासरे बाबासाहेब ज्ञानदेव सोनवणे, दीर गणेश बाबासाहेब सोनवणे (सर्व रा. हिंगोणी, ता. नेवासा), नणंद अर्चना बाबासाहेब पागिरे आणि बाबासाहेब चांगदेव (दोघे रा. वांबोरी, ता. नेवासा) यांनी संगनमत करून विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली.
​पती दारू पिऊन घरात यायचा आणि विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायचा. तसेच तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आण, असे म्हणून सासरचे इतर लोक सातत्याने शिवीगाळ व दमदाटी करत असत. छळ असह्य झाल्याने विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ