- जाहिरात -spot_img
breaking news

हातभट्टीवर पोलिसांचा छापा! पैशांच्या व्यवहारातून तरुणाला मारहाण, कामरगावात राडा, कुठे काय घडलं..

 

हातभट्टीवर पोलिसांचा छापा!; 86 हजारांचा मुद्देमाल नष्ट; तिघांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने निमगाव घाणा आणि टाकळी खातगाव परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू व रसायन तयार करणाऱ्या ठिकाणांवर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत सुमारे 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनांक 28 मे 2026 रोजी सपोनि माणिक चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, निमगाव घाणा व टाकळी खातगाव परिसरात अवैधरित्या रसायनांच्या साहाय्याने गावठी हातभट्टी दारू तयार केली जात आहे. त्यानुसार पोलीस पथकाने पंचासमक्ष छापेमारी करत कारवाई केली.
निमगाव घाणा येथील कोल्हेटेक परिसरात आरोपी राजू सखाराम गव्हाणे (वय 45) याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले 1000 लिटर कच्चे रसायन, 200 लिटर तयार गावठी दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलीसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच नष्ट केला.

तसेच टाकळी खातगाव येथे आरोपी राजेंद्र विलास पवार (वय 22) याच्याकडून 100 लिटर कच्चे रसायन, 40 लिटर तयार दारू व साहित्य असा 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आरोपी विनोद दिलीप पवार (वय 22) याच्याकडून 80 लिटर कच्चे रसायन, 30 लिटर तयार दारू व साहित्य असा 7 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी यांच्या पथकाने केली.

पैशांच्या व्यवहारातून तरुणाला बेदम मारहाण
​अहिल्यानगर: पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल सुरेश घाटेशाही (वय ३० वर्षे, राहणार गवळीवाडा, भिंगार, अहिल्यानगर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे सुद्धा वाचा :    आणे-नांदूर पठार मार्गासाठी ग्रामस्थांचे आ. सोनवणेंना साकडे

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद बांबू गल्ली, बंगाल चौकी परिसरात पहाटेच्या सुमारास घडला. फिर्यादी अमोल घाटेशाही आणि आरोपींमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले. आरोपी साकीब आमिन अक्तार आणि रिहान आमिन अक्तार (दोघे राहणार मोमिन गल्ली, भिंगार, अहिल्यानगर) यांनी त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन अनोळखी साथीदारांसह अमोल यांना गाठले. जुन्या वादाचा राग मनात धरून या चौघांनी अमोल यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

​भांडणादरम्यान आरोपींनी अमोल यांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने अमोल यांच्यावर जबर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या मारहाणीच्या घटनेनंतर अमोल यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी साकीब अक्तार, रिहान अक्तार आणि इतर दोन अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या करत आहेत.

अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; व्यापारी गंभीर जखमी
​अहिल्यानगर : शहरात वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच असून, अहिल्यानगर ते पुणे रस्त्यावरील सोनेवाडी चौकात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात पांढऱ्या रंगाच्या भरधाव टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संतोष सुरजमल बोथरा (वय ४५ वर्षे, रा. ताराबाग कॉलनी, केडगाव, अहिल्यानगर) असे या अपघातात जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी टेम्पोच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष बोथरा हे आपल्या दुचाकीवरून अहिल्यानगर-पुणे रस्त्याने शाहूनगरच्या दिशेने जात होते. ते सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास सोनेवाडी चौकाजवळ पोहोचले असता, पांढऱ्या रंगाच्या चारचाकी टेम्पोने (क्रमांक एमएच १६ डीपी ३३०५) रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपले वाहन अतिशय भरधाव वेगात चालवले. या बेजबाबदार चालकाने बोथरा यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बोथरा हे दुचाकीवरून थेट रस्त्यावर खाली कोसळले.

हे सुद्धा वाचा :  मनपाच्या 'त्या' निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध, दिला 'हा' इशारा

​सदर अपघातामध्ये संतोष बोथरा यांच्या डोक्याला आणि डोळ्याला मोठा मुका मार लागला असून, डाव्या खांद्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचे बाजूचे कव्हर फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बोथरा यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार सुरू असल्यामुळे तक्रार देण्यास काहीसा विलंब झाला. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

जेसीबीचे टायर पंक्चर काढण्याच्या वादातून मजुराला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर :जेसीबीच्या टायरचे पंक्चर काढताना ट्यूब टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका मजुराला आणि त्याच्या मुलाला लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना पोखर्डी येथे घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोखर्डी परिसरात नवनाथ आनंदा काळे हे मजुरीचे काम करतात. ते आरोपी कृष्णा परशुराम वारुळे याच्या जेसीबीच्या टायरचे पंक्चर काढत होते. त्यावेळी टायरमध्ये नवीन ट्यूब टाकावी लागेल, असे नवनाथ यांनी आरोपीला सांगितले. यावरून संतप्त झालेल्या कृष्णा याने ‘तू मला आधी का सांगितले नाही’ असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले.

​त्यानंतर आरोपी परशुराम वारुळे याने नवनाथ यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर जोरदार प्रहार केला. दुसरीकडे, आरोपी सागर विश्वास देठे याने लाकडी दांडक्याने तर अनिल वाघुंडे याने नवनाथ व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या चौघांनी मिळून बाप-लेकाला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर नवनाथ काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी कृष्णा वारुळे, परशुराम वारुळे, सागर देठे आणि अनिल वाघुंडे यांच्याविरुद्ध मारहाण व धमकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  विखे फॅक्टर मुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! : आ. प्राजक्त तनपुरे, नेमकं काय म्हणाले पहा...

कामरगाव येथे क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: मित्रासोबत वेशीजवळील बसलेल्या एका १७ वर्षीय तरुण फिर्यादीला जुन्या कारणावरून वाद घालत बेदम मारहाण केल्याची घटना कामरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तेजस सुनील ठोकळ याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामरगाव येथील वेशीजवळ फिर्यादी हा तरुण थांबलेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपी तेजस ठोकळ याने कोणत्याही कारणाशिवाय फिर्यादीच्या अंगावर थुंकून वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादीने ‘तू शिवीगाळ का करतोस?’ असा जाब विचारला असता, आरोपीचा राग अनावर झाला. त्याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने तिथेच पडलेला एक लोखंडी गज उचलून फिर्यादीच्या पाठीवर जोरात मारला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे फिर्यादी प्रचंड घाबरला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळाला.

​पळून जात असलेल्या फिर्यादीला आरोपीने मागून जोरात धमकावले. ‘तुझ्या भावाला जाऊन सांग मी तुला मारले आहे, जर माझ्या नादी लागला तर तुला संपवून टाकीन, आम्ही असे भरपूर गुन्हे केले आहेत,’ अशी थेट जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाला. या मारहाणीत फिर्यादी तरुण जखमी झाला आहे. घटनेनंतर पीडित तरुणाने नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तेजस ठोकळ याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार रेपाळे करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ