किरकोळ वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला; हातोला येथील ७ जणांवर गुन्हा
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जुन्या वादाची कुरापत काढून बीड जिल्ह्यातील हातोला येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक गहिणीनाथ विश्वनाथ राख आणि त्यांच्या दोन मुलांवर अहिल्यानगरमधील केडगाव बायपास परिसरात दगड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या मारहाणीत गहिणीनाथ राख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाळू त्रिंबक गोल्हार, विजय सुरेश गोल्हार, राजू मारुती गोल्हार, अमोल निवृत्ती गोल्हार, त्रिंबक रामभाऊ गोल्हार, सुरेश रामभाऊ गोल्हार आणि निवृत्ती रामभाऊ गोल्हार या सात जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी ट्रकचा फोटो ट्रान्सपोर्ट कंपनीला पाठवल्याच्या कारणावरून राख आणि गोल्हार कुटुंबात शाब्दिक वाद झाला होता. दि. २ मे रोजी हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्ष अंमळनेर पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र, दुपारी ३ वाजेच्या सुमारास गहिणीनाथ यांचा मुलगा बाबू हा केडगाव येथील काकडे पार्किंगमध्ये ट्रक दुरुस्तीसाठी थांबला असता, आरोपींनी त्याला गाठून शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. ही माहिती मिळताच गहिणीनाथ राख हे नातेवाइकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या आरोपींनी त्यांना पकडून राजू गोल्हार याने डोक्यात दगड घातला, तर विजय गोल्हार याने बाबूच्या पायावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फिर्यादींना पाहून आरोपी पसार झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
काम करण्यास नकार दिल्याने मजुरावर धारदार शस्त्राने हल्ला; नगर-मनमाड हायवेवरील घटना
अहिल्यानगर – नगर-मनमाड महामार्गावरील गजानन कॉलनी परिसरात एका मजुराने सोबत कामाला येण्यास नकार दिल्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी आदेश शशीकांत शिंदे (वय २४, रा. नवनागापूर) हा मजूर म्हणून काम करतो. १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तो गजानन कॉलनीतील नगर-मनमाड हायवेवर असताना आरोपी सुमित शिंदे तेथे आला. आरोपीने आदेशला “तुला काम पाहिजे असेल तर माझ्यासोबत चल” असे सांगितले. मात्र, आदेशने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. या साध्या कारणावरून आरोपीला प्रचंड राग आला.
रागाच्या भरात आरोपीने स्वतःजवळील कोणत्या तरी धारदार शस्त्राने आदेशच्या कंबरेवर आणि उजव्या खांद्याखाली वार करून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर, “जास्त माज केला तर तुला जिवे ठार मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपीने आदेशच्या दुचाकीचे (एमएच १६ डीए ९५३९) देखील नुकसान केले. जखमी आदेशवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक पालवे अधिक तपास करत आहेत.
संशयावरून मजुराला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
भिंगार कॅम्प परिसरात थरार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना फर्याबाग परिसरातील केदारवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी सुधाकर केदारे या ३० वर्षीय मजुराने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी केदारे हे केदारवस्ती भागात वास्तव्यास आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी सुहास दामोदर शिंदे, संदेश सुहास शिंदे आणि अनुग्रह सुहास शिंदे यांनी सनी यांना गाठले. यावेळी सुहास शिंदे याने सनीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वादावादी केली. रागाच्या भरात सुहासने लाकडी दांडक्याने सनीच्या डोक्यात प्रहार केला, तर संदेश आणि अनुग्रह या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले. मारहाण करून आरोपींनी सनी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सनी यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जुन्या वादातून केडगावमध्ये थरार; पिता-पुत्रासह चौघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
अहिल्यानगर: केडगाव परिसरातील काकडे पार्किंगमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्र्यंबक रामभाऊ गोल्हार यांच्या फिर्यादीवरून गहिनाथ राख, बाबू राख आणि सोमीनाथ राख यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी त्र्यंबक गोल्हार हे हातोला (जि. बीड) येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा बाळू हा केडगाव येथे राहतो. १८ एप्रिल रोजी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यावरून गहिनाथ राख यांच्याशी बाळूचा वाद झाला होता. याच रागातून आरोपींनी त्र्यंबक गोल्हार यांना फोन करून “तुमच्या मुलाला मारून टाकण्यासाठी आम्ही अहिल्यानगरला जात आहोत,” अशी धमकी दिली. धास्तावलेले त्र्यंबक गोल्हार आपल्या भावांसह केडगाव येथील कांदा मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये पोहोचले.
तेथे आधीच उपस्थित असलेल्या गहिनाथ, बाबू आणि सोमीनाथ राख यांनी इतर साथीदारांसह फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी त्र्यंबक गोल्हार, त्यांचा मुलगा बाळू आणि भाऊ निवृत्ती व सूर्यभान यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात बाळूच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
साखरपुडा कार्यक्रमात स्टेजवरून १६ तोळे सोन्याचे दागिने लंपास; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
अहिल्यानगर: केडगाव येथील श्रेया गार्डनमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना अज्ञात चोरट्याने स्टेजवरून दागिन्यांची पिशवी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सिंधू महेश माने (वय ५२, रा. तिसगाव, पाथर्डी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एकूण ७ लाख ४२ हजार रुपये किमतीचे १६ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू माने या आपल्या भाच्याच्या साखरपुड्यासाठी अहिल्यानगरला आल्या होत्या. त्यांच्याकडे स्वतःचे आणि नातेवाईकांनी दिलेले मिळून ४ तोळ्यांचा नेकलेस, ६ तोळ्यांची मोहनमाळ, ६ तोळ्यांचे गंठण आणि सोन्याची अंगठी असे दागिने एका निळ्या कापडी पिशवीत होते. रात्री पावणेआठच्या सुमारास सर्व नातेवाईक स्टेजवर फोटो काढण्यासाठी जमले असताना अचानक हॉलमधील वीज खंडित झाली. याच अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने माने यांच्या पायाजवळ ठेवलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली.
काही क्षणात वीज आल्यानंतर पिशवी जागेवर नसल्याचे लक्षात येताच हॉलमध्ये शोधाशोध करण्यात आली, मात्र दागिने मिळून आले नाहीत. भरवस्तीत आणि गर्दीच्या कार्यक्रमात झालेल्या या चोरीमुळे पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










