300 कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला अखेर हिरवा कंदील;
अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा
जामखेड :
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दळणवळण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित ठरलेला करमाळा-जामखेड राज्य महामार्गाच्या सुधारणा व रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून सुमारे 300 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
राज्य महामार्ग क्रमांक 56 अंतर्गत करमाळा-जामखेड-साकत-पाटोदा या मार्गाचा पहिल्या टप्प्यातील करमाळा ते जामखेड हा सुमारे 40 किलोमीटर लांबीचा रस्ता 10 मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट मार्गात रूपांतरित करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे वाहनधारक, विद्याथ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू राहत होती, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे हाल होत होते. आता या नव्या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
हा मार्ग करमाळा, जामखेड, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पोथरे, जवळा, नान्नज, बोर्ले, झिक्री, पाडळी फाटा यांसारख्या गावांमधून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. जवळा हे ब वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन व तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांचीही मोठी वर्दळ असते. याच मार्गावरून दूध वाहतूक, कृषी मालाची ने-आण, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दैनंदिन प्रवास व्यवस्था तसेच व्यापारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
प्रकल्पांतर्गत पोथरे, जवळा, बोर्ले फाटा, नान्नज, झिक्री आणि पाडळी फाटा या गावांच्या हद्दीत तब्बल 14 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच बसथांबे, सिमेंट काँक्रीटची बांधीव गटारे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आधुनिक व्यवस्था आणि सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे गावांमधील वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.या रस्त्यामुळे जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागाला थेट आर्थिक फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. कृषी उत्पादनांची जलद वाहतूक, दुग्ध व्यवसायाला वेग, व्यापारी संपर्क सुलभ होणे तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात हा महामार्ग मतदारसंघाच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासालाही चालना देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर
कर्जत-जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा दर्जेदार व्हाव्यात यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर माझा नेहमी भर राहिला आहे. राज्य महामार्ग 56 दर्जेदार व्हावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. महायुती सरकारने या महत्त्वपूर्ण महामार्गाच्या कामासाठी 300 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो.
प्रा.राम शिंदे- सभापती, विधानपरिषद










