सत्तेत असूनही अनुदान आणता येत नाही; मनपाकडे पगाराचे सुद्धा पैसे नाहीत
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर महानगरपालिकेने अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत तब्बल ५३८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. पाणी योजनेसाठी त्यात ३७५ कोटींच्या कर्जाचा घाट घातला जात आहे. तब्बल एक हजार कोटींच्या कर्जाचा घाट म्हणजे शहराला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा सत्ताधार्यांचा धोकादायक डाव आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असून देखील त्यांना अनुदान आणता येत नाही. म्हणून शहराला कर्जबाजारी करण्याचा उद्योग सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.
मनपाकडे साधे पगाराचे, वीजबिल भरण्याचे पैसे नाहीत. आज पे अँड पार्कची लूट सुरू आहे. मनपाच्या कर्ज घेण्याच्या योजनेला ठाकरे शिवसेनेने कडाडून जाहीर विरोध केला आहे. एक हजार कोटींच्या कर्जातून टेंडरच्या माध्यमातून ठेकेदार, सत्ताधारी, राजकीय पदाधिकारी श्रीमंत होतील. पण शहर कायमचे रसातळाला जाईल, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली आहे. पाणी व भुयारी गटर योजनेच्या नावाखाली महापालिकेवर प्रचंड आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार सुरू असून महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हे नियोजन पूर्णपणे आत्मघातकी आहे. आज वीज बिल, कर्मचारी पगारासाठी आर्थिक खळखळाट सुरू आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली कोलमडलेली आहे. निधी अभावी रस्त्यांची कामं रखडली आहेत. अशा परिस्थितीत जागतिक बँक व अन्य वित्तीय संस्थांकडून सुमारे एक हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणे म्हणजे शहराच्या भवितव्याशी खेळ करण्या सारखे आहे, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी सावेडी, फेज-०२ अमृत योजनेवर यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे उपसा करण्याची क्षमता वाढली आहे. सुमारे पाच लाख लोकसंख्येसाठी पाणी वितरण करून देखील यातून पाणी उरेल एवढी क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात नगरकरांना आजही दिवसा आड, तर काही भागांत तीन-चार दिवसांनी, तेही कमी दाबाने पाणी वितरित केले जाते. काही भागात तर आजही टँकर सुरू आहेत. असं असताना ४९५ कोटींची नवी पाणी योजना करणे म्हणजे जुन्या योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश झाकण्या साठीचा हा घाट असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
मनपा निवडणूक प्रचार सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर पाणी योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने नगरोत्थान योजनेतून सुमारे ४९५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र देवाभाऊंच्या घोषणेतील एक छदामही शहराला मिळालेला नाही. आश्वासनांना भुलून नगरकरांनी सत्ताधार्यांना मनपात एका हाती सत्ता दिली. राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान आणण्याऐवजी जनतेच्या माथी कर्जाचा डोंगर का लादला जात आहे? असा सवालही काळे यांनी उपस्थित केला आहे. शहराला आर्थिक विनाशाकडे नेणार्या या कारभारा विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून ठाकरे शिवसेना तीव्र जनआंदोलन छेडले, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.










