औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक याचिका फेटाळली | जनतेसोबत न्यायालयीन लढाई जिंकली
पारनेर | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत नीलेश लंके विजयी झाल्यानंतर त्यांच्या निवडीला माजी खा. सुजय विखे यांनी आव्हान देत दाखल केलेेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत खा. लंके यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयासोबतच न्यायालयीन लढाईतही लंके यांनी आपली बाजू भक्कम सिद्ध केली आहे.
दि.१३ मे २०२४ रोजी पार पडलेल्या मतदानानंतर ४ जून २०२४ रोजी जाहीर झालेल्या निकालात खा.नीलेश लंके यांनी ६,२४,७९७ मते मिळवत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा २८,९२९ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर १८ जुलै २०२४ रोजी डॉ. सुजय विखे यांनी लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ नुसार याचिका दाखल करून लंके यांच्या निवडीला आव्हान दिले होते. या प्रकरणात समन्स मिळाल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज सादर केला या अर्जाद्वारे संबंधित निवडणूक याचिका कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्यामुळे ती फेटाळून लावावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी या प्रकरणातील सर्व बाजूंचे युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतले. खा.लंके यांच्यावतीने अॅड. प्रमोद पाटील यांनी प्रभावी मांडणी केली. त्यांना अॅड. राहुल जोंधळे, अॅड. राहुल तेमक, अॅड. श्याम सोलंके आणि अॅड. राहुल झावरे यांनी सहकार्य केले.अखेर ८ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने निकाल देत खासदार नीलेश लंके यांचा अर्ज मंजूर केला आणि डॉ. सुजय विखे यांची याचिका ही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्यामुळे फेटाळून लावली.
सत्ममेव जयते
हा सत्याचा, न्यायाचा आणि जनतेच्या अटळ विश्वासाचा विजय आहे. लोकसभेच्या निकालानंतर काहींनी जनतेच्या कौलाचा अपमान करत न्यायालयात धाव घेतली. खोटे आरोप, दबाव आणि निकाल बदलण्याचे प्रयत्न झाले; मात्र सत्य कधीच हरत नाही, हे आज पुन्हा सिद्ध झाले. मी न्यायव्यवस्थेचा मनापासून आभारी आहे. हा आनंद वैयक्तिक नसून जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. आम्ही कोणत्याही दबावाला झुकणार नाही. आमचा स्वाभिमान कायम ठेवत जनतेची सेवा करत राहू. अखेर सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली.










