- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंची तुफान टोलेबाजी, ठाकरे कडाडले…

मुंबई / नगर सह्याद्री –
उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आमदार सचिन आहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज भरला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, आज सचिन आहिर यांनी षटकार मारला आहे. सहा खासदारांनी षटकार ठोकले. आता सहा मतदारसंघात काही जाऊन आले. त्यांचे सचिन आहिर यांनी षटकार मारून स्वागत केले. चौकार, षटकार सुरुच आहे आणि राहतील. एकेक विकेट पडत राहील. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. सचिन आहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार होते. आता विधानपरिषदेचे आहेत, राज्यमंत्री होते, सात विभागांचं राज्यमंत्रिपद होते. गिरणी कामगारांचे नेते म्हणून काम केले. अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदांवर काम केले. कोळीवाड्यांचा मूळ मुंबईकर, भूमिपुत्रांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ओळख आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला, कामगारांना, कोळीबांधवांना शिवसैनिकांना न्याय देणार नेता म्हणून सचिन आहिर यांची ओळख आहे.

खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापतिपदाचा अर्ज भरला आहे. महायुतीकडून फॉर्म भरला आहे. महायुती आज मजबुतीने दोन्ही सभागृहात बहुमतात आहे. त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्याच त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. ते फक्त मुंबईपुरते नाही, तर महाराष्ट्रात उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. ते आल्याने शिवसेनेची देखील ताकद मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात, कामगार क्षेत्रात असेल किंवा त्यांनी केलेल्या कामाचे विभाग आहेत तिथे ताकद वाढेल.

पुढे उपमुख्यमंत्री म्हणाले, ताकद वाढण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षात त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टीम म्हणून काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देतो. गेल्या काही काळात बघितलं तर २०२२ ला देखील ज्या वेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उठाव झाला. आज ३० जूनला बरोबरच आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला होता. परंतु अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कारकीर्दीत जे काम केले, दोघांनी टीम म्हणून काम केलं. राज्यात अनेक वर्षांपासूनचे प्रकल्प प्रलंबित होते, त्याला चालना दिली. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर १ वर आणला असेही त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा :  मान्सून 26 मे रोजी केरळात

शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विकासाचा वेग बघितला तर गेल्या चार पाच वर्षांत ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास होतो. डबल इंजिनचं सरकार काम करतंय. केंद्रातून पंतप्रधान मोदी आम्हाला पाठिंबा देतात, सहकार्य करतात. मोदींच्या सरकारने गेल्या १० वर्षांत भरभरून निधी दिला. मोठी गुंतवणूक येत आहे. लोकप्रतिनिधींना सर्वांत महत्त्वाचे काय हवे असते, तर विकास. त्यांच्या मतदारसंघातील जनतेला न्याय मिळावा, ही त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच ते आमच्यासोबत येत आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्या जवळच्या लोकांना पक्षाकडून सर्वकाही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात. त्यामुळे यात धक्का बसण्यासारखं काहीही नाही.” वरळी आणि शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत ते म्हणाले, “वरळी आणि शिवडी हा आमचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आम्ही तिथे सातत्याने काम केलं आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही.”
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. “अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबाडणार? अनेक पदं देऊनही अजून काय हवं आहे?” असा सवाल त्यांनी केला. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, “जे आपल्या मंदिरांची लूट करत आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कसे बसू शकता? ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरही भाष्य केले. “आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की, हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे,” असा आरोप त्यांनी केला. उपसभापतीपदाबाबतही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “उपसभापतीपदावर भाजपचाच एखादा कार्यकर्ता का बसलेला नाही? याचा विचार भाजपनेच करायला हवा,” असे ते म्हणाले. पक्षांतर्गत कारवाईबाबत विचारले असता, “जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही निश्चितपणे करू. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “भाजपचे अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत आहेत. मग त्यांना कोणतेही मोठे पद का मिळत नाही?” असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा :  महिला आरक्षणावरून राजकारण तापले, आरक्षण नव्हे, संरक्षण हवे

मी शिवसेना सोडली नाही- सचिन अहिर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीसाठी अर्ज दाखल केला. एकनाथ शिंदेंनी एखाद्या सामन्य कार्यकर्त्याला ही संधी देणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिंदे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण ताकदीने पार पाडेन. शिवसेना मी सोडली नाहीये. पक्ष सोडला की नाही या तांत्रिक बाबीवर नंतर बोलेन., असं सचिन अहिर म्हणालेत. पत्रकाराच्या सचिन अहिर यांनी शिवसेना सोडली का? या प्रश्नाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं. सचिन अहिर जेव्हा आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलं, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आता शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला नाहीये, ते शिवसेनेतच आहेत. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सचिन अहिर यांनी सोडल्यानंतर मुंबईच्या वरळी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चत आलंय. त्यातच ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. “वरळी ही कोणत्याही एका व्यक्तीची नाही, ती शिवसेनेची आहे,” असे म्हणत पुढे त्यांनी पक्षातील नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ