जामखेड | नगर सह्याद्री
तालुक्यातील सोनेगाव ते धाराशिव जिल्ह्यातील परांडा दरम्यानची बहुप्रतीक्षित एसटी बससेवा गुरुवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे सीमावत भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी परांड्याकडे ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोनेगाव-धनेगाव-चिंचपूर-वाटेफळ-आनाळा-परांडा या मार्गावर लाल परी धावू लागल्याने सीमावत गावांतील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या मार्गावर थेट एसटी सेवा नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहने किंवा दुचाकीचा आधार घ्यावा लागत होता. परिणामी प्रवासासाठी अधिक वेळ आणि खर्च करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यापारी तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती.
परांडा हे शिक्षण, आरोग्य सेवा, कृषी बाजारपेठ आणि विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख केंद्र असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. मात्र थेट बससेवा उपलब्ध नसल्याने अनेकांना दोन ते तीन वाहने बदलून प्रवास करावा लागत होता. आता एसटी सेवा सुरू झाल्याने हा प्रश्न मोठ्या प्रमाणात माग लागला आहे.
या बससेवेसाठी धनेगावचे सरपंच महेश काळे, सोनेगावचे सरपंच डॉ. विशाल वायकर, मदन महाराज, परांडा पंचायत समिती सदस्य गणेश भिलारे, बबन महाराज भोसले, जयसिंग जाधव, सोनेगाव ग्रामपंचायत सदस्य आश्रु खोटे, अतुल बिरंगळ, मारुती बोलभट, पद्माकर बिरंगळ, पंडित बिरंगळ आणि अजित कुलकण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेत एसटी प्रशासनाने बससेवा सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर, वाटेफळ आणि परिसरातील गावांचा धाराशिव जिल्ह्यातील परांडाशी दैनंदिन संपर्क आहे. त्यामुळे या बससेवेचा लाभ दोन्ही जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील नागरिकांना होणार आहे.










