अक्षय कर्डिलेंच्या बाजूने अंडरकरंट असला तरी…! प्राजक्त तनपुरेंना का नकोय विखेंसोबत पंगा?
सारीपाट / शिवाजी शिर्के –
विधानसभेच्या राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी भगव्या टोप्या घालून प्राजक्त तनपुरे अन् अक्षय कर्डिले हे दोघेही एका व्यासपीठावर आले. त्याच दरम्यान राहुरीतील भाजपाच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी घेतील असे सुजय विखे पाटील यांनी जाहीर करुन टाकले. निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात होणार आणि सर्व्हेत ज्याचे नाव पुढे असेल त्याची उमेदवारी जाहीर होणार अशी भूमिकाही विखे पाटलांनी जाहीर केली. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ असे जाहीर केले. भाजपा आणि राष्ट्रवादीचा उमेदवार कोणीही असला तरी येथील गुुलाल सुजय विखे पाटील ठरवणार त्याच्याच अंगावर पडणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. अक्षय कर्डिले यांच्या बाजूने सहानुभूतीसह अंडरकरंट असला तरी त्यांच्यात परीपक्वता दिसायला तयार नाही. दुरदृष्टीच्या राजकारणाचा विचार करता प्राजक्त तनपुरे यांना सुजय विखेंसोबत पंगा घेण्याचा मोठा धोका वाटत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच सुजय विखे यांच्यासोबत राजकीय पंगा घेण्यात प्राजक्त तनपुरे हे तयार नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधीची ही शेवटची निवडणूक
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यात नगर जिल्ह्यात किमान तीन आणि जास्तीत जास्त चार लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतात. याशिवाय विधानसभेच्या जागा १२ वरुन १४ ते १६ वर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातून आरक्षणही बदलणार हे नक्की! याचाच अर्थ त्याआधीची नगर जिल्ह्यातील ही शेवटची निवडणूक असणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात ज्या पद्धतीने सुजय विखे पाटलांनी लक्ष घातले आहे ते पाहता ते एकही निवडणूक सहजासहजी सोडतील असे वाटत नाही.
जिल्हा बँक-जिल्हा परिषदेतील बेरजेची समीकरणे होणार
राहुरी विधानसभा निवडणूक संपते न संपते तोच जिल्हा बँकेची निवडणूक लागणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक मोठी नांदी ठरणार आहे. एरवी विखे पाटील विरुद्ध जिल्ह्यातील दिग्गज असे चित्र बँक निवडणुकीत राहायचे. मात्र, आता यावेळी तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणूक असणार आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये आणि नगरच्या महापालिका निवडणुकीत सुजय विखे पाटलांनी ज्या पद्धतीने ट्रेलर दाखवून दिला ते पाहता जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा संपूर्ण पिक्चर उभा राहिलेला दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
कोपरगावमध्ये शब्द पाळणारे विखे पाटील!
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विखे पाटलांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली होती. मात्र, दुसर्या क्षणाला भाषणाला उभे राहिलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शब्द दिला की पाळणार हे ठणकावून सांगितले. तेथील निकालानंतर ते अधोरेखीतही झाले. आता राहुरीमध्ये तर विखे पाटलांचे मोठे प्राबल्य. दिल्ली- मुंबईतून कोणीही उमेदवार ठरला तरी विखे पाटलांची भूमिका त्यात महत्वाची ठरणार हे नक्की!
थोरात- गडाखांसह प्रस्थापितांना शह; म्हणूनच नकोय तनपुरेंना रिस्क!
बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्याचे बाळासाहेब विखे यांचे स्वप्न सुजय विखे पाटील यांनी पूर्ण केले. थोरात- गडाख या दोघा प्रस्थापितांच्या विरोधात आणि निलेश लंके या प्रस्थापित होऊ पाहणार्याच्या विरोधात सामान्य कुटुंबातील सदस्य विधानसभेत निवडून आणण्यात पडद्याआड राहून सुजय विखे पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. नगर महापालिकेत सुजय विखे यांनी त्यांचा जादुई करिष्मा दाखवून दिला. पोट निवडणुकीत फासे उलटे पडले तर लागोपाठ दोन पराभव माथी पडतील आणि त्याचे परिणाम काय होतील हे प्राजक्त तनपुरे यांना चांगलेच माहिती आहेत. म्हणूनच सुजय विखे यांच्या विरोधात जाऊन आणखी मोठी का घ्यायची असा प्रश्न आता तनपुरे समर्थक देखील उपस्थित करु लागले आहेत.
‘पद्मभूषण’ची आठवण करून देणारा सुजय
झाला सामान्यांच्या गळ्यातील ताईत!
पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत अनेकदा जोखीम पत्करणारे राजकारण केेले. हे करताना पक्षाच्या नेतृत्वाचा रोषही त्यांनी स्वीकारला. त्याच्या परिणामांची चिंता त्यांनी कधीच केली नाही, मात्र, हे करताना जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड त्यांनी कमी होऊ दिली नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी कायम संयमी राजकारण केले आणि राजकीय पकड देखील कायम ठेवली. डॉ. सुजय विखे पाटील यांचे नेतृत्व तयार झाले आणि त्यांच्या नसानसात जनतेला पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील दिसू लागले. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेतील पराभवानंतर जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटावरील सोंगट्या यशस्वी खेळल्या आणि रथी महारथी गारद केले.










