१ लाख १२ हजार ५८७ मताने विजय; विरोधकांचे डिपॉझिट जप्त
राहुरी | नगर सह्याद्री
जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळविला. एक लाख १२ हजार ५८७ मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला आहे. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखत ही निवडणूक एकतर्फी जिंंकली. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत वाढदिवशी दिनी अक्षय कर्डिले यांना मतदारसंघातील जनतेने लाखांचे मताधिक्य देत वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे.

राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपचे अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे गोविंद मोकाटे यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दि.२६ एप्रिल रोजी ५६.२० टक्के इतके मतदान झाले होते. १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदान केले होते. आज सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक प्रशासनाने मतमोजणीसाठी २० टेबलांची व्यवस्था केली होती.
एकूण २७ फेर्यांमध्ये ही मोजणी पूर्ण झाली. मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या फेरीत अक्षय कर्डीले यांना ४२६६ मतांची आघाडी मिळाली. दुसर्या फेरीत ही आघाडी ९६३७ इतकी झाली. तिसर्या फेरीत १४७११ मतांनी घेतलेली आघाडी ही वाढत जाऊन थेट २७ व्या फेरी अखेर १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली. मतदान केंद्राबाहेर अक्षय कर्डिले यांच्या विजयाच्या घोषणा सुरुच होत्या. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके वाजवत जल्लोष केला. विशेष म्हणजे आज अक्षय कर्डिले यांचा वाढदिवस असून, कार्यकर्त्यांनी ’विजयी आमदार’ म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
उमेदवारांना मिळालेेेली अंतिम मते
* अक्षय कर्डिले १४००९३ * गोविंद मोकाटे २७५०६ * संतोष चोळके ५६९० * अॅड.अर्थव म्हसे ११४८ * रावसाहेब खेवरे ७२९९ * सूर्यभान लांबे १३६८ * महेश हापसे २०५१ * नोटा १६३२










