2 कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कामरगाव परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली असून तब्बल 2,01,09,628 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक 23 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, पुणे-अहिल्यानगर रोडलगत कामरगाव शिवारात एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये तीन गॅस टँकरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात आहे.
माहितीची खात्री करून पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, 3 एचपी गॅस टँकरमधून अवैध रिफिलिंग सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळी कारवाई करत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन बोधले, माणिक गुट्टे, उल्हास कवडे आणि अमृत ठोकळ यांचा समावेश आहे.
चौकशीत आरोपींनी कोणताही शासकीय परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस टँकरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याची कबुली दिली. तसेच ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक पद्धतीने करण्यात येत होती, ज्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता.
या कारवाईत पोलिसांनी 57.200 टन गॅस, 3 गॅस टँकर, भारत गॅसचे सिलेंडर, एक अशोक लेलँड टेम्पो तसेच रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 2 कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, जीवनावश्यक वस्तू कायदा, एलपीजी नियमन आदेश, गॅस सिलेंडर अधिनियम व स्फोटक पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.










