प्रगत विद्यालयाच्या लिपिकाविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
येथील गांधी मैदान परिसरातील प्रगत विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक केल्याप्रकारणी विद्यालयाचा लिपिक लुहाण लक्ष्मण पहिलाजरॉय याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लु गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी लिपिकाने फिर्यादीचा मुलगा आणि इतर चार विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्याकडून बारावी बोर्ड एटीकेटी परीक्षेचे शुल्क रोख स्वरूपात गोळा केले होते. मात्र, सदर रक्कम ऑनलाइन पद्धतीने बोर्डाकडे जमा न करता, एकूण ३ हजार १५० रुपयांचा अपहार केला.
यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गायकवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी लुहाण पहिलाजरॉय विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
महिला वकिलाला जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर : सावेडी येथील प्रेमदान हाडको भागात एका महिला वकिलाचा विनयभंग करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमदान हाडको भागात राहणार्या एका ५० वर्षीय महिला वकिलाच्या घरासमोर हा प्रकार घडला. दिनांक १८ मे २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. संशयित आरोपी नंदकुमार लक्ष्मण मोरे आणि गोरक्षनाथ तुकाराम गव्हाणे (दोघे रा. प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर) यांनी घरासमोर थांबून पीडित महिला वकिलाच्या दिशेने अश्लील हावभाव केले. आरोपींनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली.या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नंदकुमार लक्ष्मण मोरे आणि गोरक्षनाथ तुकाराम गव्हाणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत.
फोन करण्याच्या बहाण्याने हॉटेल चालकाला लुटले
अहिल्यानगर: शहरातील काटवन रेल्वे स्टेशन रोडवरील गायके मळा परिसरात एका हॉटेल चालकाला गाठून चार अनोळखी चोरट्यांनी २८ हजार ३७६ रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल रावसाहेब भोर (वय ३२, रा. चास, अहिल्यानगर) यांचे चास येथे चुल मटन रस्सा नावाचे हॉटेल आहे. १५ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विशाल भोर हे गायके मळा परिसरातून जात होते. त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येत मला तातडीचा फोन करायचा आहे, तुमचा मोबाईल द्या अशी विनंती केली. भोर यांनी विश्वासाने आपला मोबाईल फोन त्याच्या हातात दिला.त्या इसमाने मोबाईल कानाला लावून बोलण्याचा बहाणा केला आणि दबा धरून बसलेल्या दुसर्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून तो पळून गेला. विशाल भोर काही समजण्याच्या आतच आणखी एक अनोळखी इसम मोटारसायकलवर तिथे आला. मचला, मी तुम्हाला चोर कुठे गेले ते दाखवतो असे सांगून त्याने भोर यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे चार अनोळखी आरोपींनी संगनमत करून विशाल भोर यांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि फोन पे खात्यावरील २ हजार ८७६ रुपये, असा एकूण २८ हजार ३७६ रुपयांचा माल फसवणूक करून चोरून नेला. या घटनेनंतर विशाल भोर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.










