- जाहिरात -spot_img
breaking news

सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व ही माझ्यासाठी सर्वोच्च गौरवाची बाब: लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे प्रतिपादन

हिवरे बाजार ग्रामस्थांतर्फे सन्मान
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी हिवरे बाजार येथे केले. त्यांच्या हिवरे बाजार भेटीदरम्यान ग्रामस्थांतर्फे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन व फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना निंभोरकर म्हणाले की, भारताच्या नकाशावर कोरलेले आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट देण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि सन्मानाचा क्षण आहे. एकेकाळी ओसाड, दुष्काळग्रस्त आणि गरिबीने ग्रासलेल्या या गावाचे आज देशातील सर्वोत्तम आदर्श गावांपैकी एका गावात झालेले रुपांतर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे. ही उल्लेखनीय आणि अतुलनीय कामगिरी पद्मश्री पोपटराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि निस्वार्थ सेवेमुळे शक्य झाली आहे.

राष्ट्रीय सैन्यदल एकजुटीने शत्रूवर हल्ला करते तेव्हाच यश मिळते. त्याचप्रमाणे हिवरे बाजारनेही एकजुटीने राहून गावाचा विकास साधला आहे. सभागृहात निवडून जाणे सोपे असते; मात्र हिवरे बाजारसारख्या गावात सातत्याने ग्रामविकासाची कामे सुरू ठेवणे अत्यंत कठीण असते, असेही त्यांनी नमूद केले. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होणारी कुटुंबे आपण पाहत आहोत, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निंभोरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा वापर करून देशासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कारगिल युद्धातील ऑपरेशन विजयदरम्यान त्यांनी शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलून गंभीर जखमी अवस्थेतही असीम धैर्याने आपल्या तुकडीचे नेतृत्व केले. रणांगणावरील त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास भारतीय सैन्यदलाचा कळस आहे.

दहशतवादविरोधी अभियानात २२ दहशतवाद्यांचा निःपात, तसेच २०१६ मधील ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईकमध्ये शत्रूच्या घरात घुसून एकही भारतीय सैनिक न गमावता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारी रणनीती जगातील लष्करी इतिहासात मास्टर क्लास ठरली, असेही पवार यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा :  काँग्रेसला मिळाले तीन जिल्हाध्यक्ष! चव्हाण, गुजर, पाटील यांच्यावर सोपवली जबाबदारी...

या प्रसंगी हिवरे बाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, व्हाइस चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, चंद्रकांत शिंदे, एस. टी. पादीर सर, राजेंद्र हरिभाऊ ठाणगे, राजेंद्र सहादू ठाणगे, मंगेश ठाणगे, जयहिंद संघटनेचे नीलकंठ उल्हारे, मारुती ताकपेरे, अशोक मुठे यांच्यासह माजी सैनिक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ