भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी मार्गस्थ
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आषाढी वारीनिमित्त केडगाव येथील श्री भैरवनाथ पायी दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात शेकडो वारकरी भाविकांनी उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला.
भैरवनाथ पायी दिंडी ही गेल्या 35 वर्षांची आध्यात्मिक परंपरा जपत वारकरी संप्रदायातील सेवा, श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि माणुसकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहे. ज्येष्ठ नेते, दिंडीचे मार्गदर्शक असलेले भानुदास एकनाथ कोतकर, सुरेखा भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र पंढरपूरकडे बुधवारी सकाळी दिंडीचे प्रस्थान झाले.
यावेळी उदयनराजे संदीप कोतकर यांनी सांगितले की, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत परंपरेने समाजाला भक्ती, सेवा, समता आणि मानवतेचा मार्ग दाखविला आहे. पंढरपूरची वारी ही केवळ यात्रा नसून मन शुद्ध करणारी, समाजात बंधुभाव वाढविणारी आणि प्रत्येकाला अध्यात्माची अनुभूती देणारी पवित्र परंपरा आहे. श्री भैरवनाथ पायी दिंडीचे मार्गदर्शक भानुदास कोतकर, सुरेखा कोतकर, उद्योजक सचिन कोतकर, दिंडी चालक रामदास महाराज क्षीरसागर, मारुती महाराज जने, भागीनाथ बापू कोतकर, ईश्वर महाराज नवसुपे, भागवत महाराज सातपुते, भिमराज महाराज सातपुते यांच्यासह वारकरी बांधव, ग्रामस्थ, युवक आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा देत विठ्ठल-रुक्मिणी चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात भैरवनाथ दिंडी मार्गस्थ झाली.
सुभाश्री फाउंडेशनच्या वतीने फिरते शौचालय भेट : उदयनराजे कोतकर
श्री भैरवनाथ पायी दिंडीचे मार्गदर्शक भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संकल्पनेतून सुभाश्री फाऊंडेशनच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी महिलांसाठी फिरते शौचालय भेट देण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात, या हेतूने सुमारे 10 लाख रुपयांचे 10 फिरते शौचालय भेट देण्यात आल्याची माहिती सुभाश्री फाउंडेशनचे अध्यक्ष उदयनराजे संदीप कोतकर यांनी दिली. यावेळी आदित्ययनराजे कोतकर उपस्थित होते. दरम्यान, पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सुविधेसाठी संदीप दादा कोतकर युवा मंचच्या वतीने इलेक्ट्रिक गाडी भेट देण्यात आली होती. यंदाही कोतकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत महिला वारकऱ्यांसाठी केलेली शौचालयाची सुविधा यामुळे महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.










