- जाहिरात -spot_img
breaking news

माळीवाड्यात वृद्धाला लुटले, कुऱ्हाडीने हल्ला.. मंगळसूत्र लांबवले; महिलेला धमकी, मुलीचा पाठलाग, रिक्षाचालकाची मुजोरी.. कुठे काय घडलं

दोन मजुरांना मारहाण करत ३९ हजारांचा ऐवज लांबवला
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहर परिसरातील केडगाव लिंक रोडवर एका निर्जन स्थळी अनोळखी रिक्षाचालकाने दोन मजुरांना बेदम मारहाण करत लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्याने रोख रकमेसह मोबाईल व चांदीची साखळी असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शाहूनगर (केडगाव) येथे राहणारे गवंडी कामगार बादल भारत रामरज्जत आणि त्यांचे मित्र गुन्हागार राम निषाद हे दोघे २१ जुलैच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास लिंक रोडने जात होते. त्यावेळी एका अनोळखी रिक्षाचालकाने आपली रिक्षा एका निर्जन ठिकाणी थांबवली. त्यानंतर त्याने बादल रामरज्जत आणि गुन्हागार निषाद या दोघांशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली.
​रिक्षाचालकाने दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने बादल यांच्या जवळील १० हजार रुपये रोख आणि ५०० रुपयांचा मोबाईल, तर गुन्हागार निषाद यांच्या जवळील ११ हजार रुपये रोख, ९ हजार ५०० रुपये किंमतीची चांदीची साखळी आणि ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला व तेथून पळ काढला.

​घटनेनंतर पीडितांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन आपबीती सांगितली. बादल रामरज्जत यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.

शाळकरी मुलीचा पाठलाग करून धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर – ​अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून तिचा सतत पाठलाग करणाऱ्या एका तरुणाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मे ते २१ जुलै दरम्यान घडली असून, या प्रकरणी २२ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  श्रीगोंदा, कर्जतमध्ये मुसळधार पाऊस; शेती, फळबागा, घरांचे नुकसान, मान्सूनची महत्वाची अपडेट

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने अल्पवयीन मुलीच्या आईच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील व लज्जास्पद संदेश पाठवले. इतकेच नव्हे तर, ती मुलगी शाळेत जात असताना तो सातत्याने तिचा पाठलाग करत होता. मुलीच्या कुटुंबाने या त्रासाबाबत जाब विचारला असता, संशयिताने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “मी सहा महिने जेलमध्ये जाऊन येईन, तुम्हाला काय करायचे ते करा, मी कोणाला घाबरत नाही,” अशी धमकी देऊन त्याने कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

​सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक करत असून, पोलीस सध्या घटनास्थळाचा पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

थकलेले घरभाडे मागितल्याचा राग; अहिल्यानगरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी, दोन जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर –
​अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर दर्गा दायरा रोड परिसरातील संजोगनगर येथे घरभाड्याच्या वादातून एका महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची गंभीर धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजोगनगर येथील रहिवासी राजश्री नंदकुमार गोड यांच्या मालकीच्या घरात आरोपी इरफान शेख आणि नसरीन शेख हे दोघे भाड्याने राहत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्याकडून घरभाड्याची रक्कम थकली होती. त्यामुळे फिर्यादी राजश्री गोड या आरोपींकडे थकलेले पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या.
​थकीत भाडे मागितले असता आरोपींनी, “आम्ही तुम्हाला पैसे दिले आहेत, आता आम्ही कोणतेही पैसे देणार नाही” असे सांगून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादी राजश्री गोड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच, “यापुढे पुन्हा पैसे मागण्यासाठी आलीस तर तुला थेट जीवे मारून टाकीन” अशी गंभीर धमकी दिली.

हे सुद्धा वाचा :  ऑगस्टअखेर पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यास प्राधान्य द्या; मंत्री विखे पाटील यांनी काय दिले निर्देश पहा

​या प्रकारानंतर घाबरलेल्या फिर्यादी राजश्री गोड यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी इरफान शेख व नसरीन शेख यांच्याविरोधात नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करत आहेत.

माळीवाडा परिसरात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून लुटले; ६ जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा भागातील ब्राम्हण गल्लीमध्ये एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा बदाम व रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राम्हण गल्ली येथील रहिवासी केरप्पा रामचंद्र हुच्चे (वय ७२) हे २१ जुलै रोजी रात्री आपल्या घरी असताना, मध्यरात्री १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास काही तरुण त्यांच्या घरासमोर उभे राहून जोरात आरडाओरडा व शिवीगाळ करत होते. घराबाहेर अचानक सुरू असलेला गोंधळ ऐकून केरप्पा हुच्चे हे नक्की काय प्रकार घडला आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर आले. त्यांनी तरुणांना शिवीगाळ न करण्याबाबत विचारणा केली.

​याचा राग धरून टोळक्यातील आरोपी कृष्णा भागानगरे, ओंकार घोलप, शिवम घोलप, भय्या बिडकर, आदित्य करमाळकर आणि दर्शन बोरा यांनी फिर्यादी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्यावर लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. मारहाणीदरम्यान आरोपींनी हुच्चे यांच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम आणि खिशातील ३५० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली व तेथून पळ काढला.
​या घटनेनंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  केडगावमध्ये महिलेला लुटले, भिस्तबागजवळ गोळीबार, अवैध दारूविक्रीविरोधात छापेमारी, कुठे काय घडलं

कुऱ्हाडीने हल्ला करून सोन्याचे मनी मंगळसूत्र लांबवले; देऊळगावसिद्धीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांनी गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून पळ काढला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगावसिद्धी परिसरामध्ये १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. श्रीमंत जीवलाल चव्हाण आणि अनिता श्रीमंत चव्हाण (दोघे रा. देऊळगावसिद्धी) यांनी जुन्या वादातून अनिता भोसले यांच्या घरासमोर जाऊन वाद घातला. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपींनी कुऱ्हाडीने थेट डोक्यात वार केले. या हल्ल्यात अनिता भोसले आणि त्यांचा मुलगा संकेत भोसले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

​हल्ल्यादरम्यान आरोपींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून नेले. या घटनेनंतर परिसरात मोठा खळबळ उडाली आहे. जखमींवर उपचार केल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
​या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गुंजाळ करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ