संगमनेर / नगर सह्याद्री :
पंचायत समितीतील मारहाण प्रकरणात न्यायालयाने अभिषेक थोरात यांच्यासह चौघांना मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हा निर्णय दिला.
सदर प्रकरणात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे नेते शरद नाना थोरात व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते.
अर्जदारांच्या वतीने ऍड. शोण दिपक थोरात यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, एका महिलेने तिच्या पगाराबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी शरद नाना थोरात गेले असता त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याने महिलांना ठिय्या आंदोलन करावे लागल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या युक्तिवादाला ऍड. प्रमोद शिंदे, ऍड. अजिंक्य शिंदे आणि ऍड. आकाश जाधव यांनी सहकार्य केले.
दरम्यान, सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला विरोध करत आरोपींनी सरकारी कर्मचाऱ्याला कामापासून रोखून मारहाण केल्याचा आरोप करत जामीन नाकारण्याची मागणी केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तपासासाठी आरोपींना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, शिवामृत बोखारे व एका महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे शरद नाना थोरात आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.










