डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांनी केली हॉस्पिटलच्या कामाची पाहणी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहराची वेगाने वीकासात्म्क प्रगती होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे पूर्ण ताकदीने आ.जगताप यांच्या मागे उभे आहेत. महानगरपालिकेच्या जिजामाता भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी यासाठी निधी दिला. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी गणेश भोसले यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. शहरमध्ये गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत चांगल्या दर्जेदार अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने उभारण्यात आलेले हे राजमाता जिजाऊ भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राज्यातील महानगरपालिकांमधील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल ठरेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले.
भोसले आखाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य चार माजली राजमाता जिजाऊ भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या कामाची पहाणी बुधवारी सायंकाळी डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांनी केली. यावेळी डॉ.विखे यांनी विविध सूचना केल्या. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महेश लोंढे, रोहन सानप, अभिजित बोरुडे, मनापा आरोग्याधिकारी डॉ.सतीश राजूरकर, शहर अभियंता पारखी आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वमालकीचे मोठे अद्ययावत हॉस्पिटल व्हावे ही बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत आहे. या हॉस्पिटलच्या उर्वरित कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठे सहकार्य केले आहे. माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी या कामाची पाहणी करून काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच या हॉस्पिटलचे लोकार्पण होईल. येत्या १ मे ला महाराष्ट्रदिनी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहेत. यामध्ये चितळे रोड नेहरू मार्केटचे भूमिपूजन, सावेडी बसस्थानकचे भूमिपूजन, तारकपूर रस्त्यावरील पथदिव्यांचे उद्घाटन, तसेच हरितनगर प्रकल्पा अंतर्गत व्रुक्षारोपण आदी महत्वाचे कामे होणार आहेत.
यावेळी डॉ.सतीश राजूरकर यांनी हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या विविध अद्ययावत सुविधांची सविस्तर माहिती देताना सांगितले, महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य चार माजली राजमाता जिजाऊ भोसले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये १२५ बेड, चार ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एनआयसीयू, बालरुग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर, ८ ओपीडी विभाग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, ईसीजी, पॅथॉलॉजी लॅब, कॅन्टीन, मेडिकल स्टोअर, कॉन्फरन्स हॉल, स्पेशल रूम्स, तसेच प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. सुभाष गांधी, परेश, अक्षय व पावन गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले.










