पारनेर | नगर सह्याद्री
शेतकर्यांची कामधेनू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या मासिक बैठकीत कृषी प्रदर्शनावर झालेल्या खर्चाचा हिशोब मागितला असता माजी सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी शिवागाळ व दमबाजी केल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक शंकर नगरे यांनी केला आहे. याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संचालक नगरे यांनी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवशे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बाजार समितीच्या निधी व खर्चाबाबत विचारणा केली असता भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्याचा राग मनात धरून, माजी सभापती किसान रासकर यांनी मला सर्व संचालकांसमोर अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर, सभापती किसान रासकर यांनी मला शारीरिक इजा करण्याच्या प्रयत्न केला. सचिव सुरेश आढाव यांनी अर्वाच्य भाषा वापरली असल्याचा आरोप नगरे यांनी केला आहे. बाजार समितीचे तत्कालीन सभापती व सचिवांचे हे वर्तन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींचे व नैतिकतेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी लेखापरीक्षकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी संचालक नगरे यांनी केली आहे.
शासकीय नियमानुसार कृषी प्रदर्शनाचा खर्च
पारनेर येथील बाजार समितीच्या लगतच्या मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन शेतकर्यांसाठी असल्याने शेतकर्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्या परवानगीने व बाजार समितीचा खर्चाबाबत परिसर ठराव घेऊन कृषी प्रदर्शनाला खर्च करण्यात आलेला आहे. शेतकर्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, माहिती मिळावी या उद्देशाने हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे हा खर्च कुठल्याही प्रतिष्ठानच्या नावे झालेला नसून शेतकर्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी हा खर्च झालेला आहे. दुसरीकडे जे बाजार समितीचे बदनामी करत आहे. त्यांनी संचालक असतानाही किती कामे करून घेतली याचा हिशोबच आम्हाला जनतेपुढे मांडावा लागेल.
– माजी सभापती किसनराव रासकर व बाबासाहेब तरटे
राजकीय द्वेषातून आरोप
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या मासिक बैठकीमध्ये असा कोणताही प्रकार घडला नाही. त्यामुळे ही आरोप राजकीय द्वेषातून झाले असावेत.
– गंगाराम बेलकर,
सभापती, पारनेर बाजार समिती










