पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील माजमपूर (राळेगण थेरपाळ) येथे घराचा दरवाजा लोटून झोपलेल्या वृद्धेला मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणार्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे.
अशोक भाऊसाहेब आढाव (वय २६, रा. माजमपूर, ता. पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ९ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास माजमपूर येथे फिर्यादीची सासू घरात झोपलेली असताना एका अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश केला. त्याने वृद्धेला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते. या धक्कादायक घटनेनंतर पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलम बीएनएस ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर त्याचे मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हे शोध पथक रवाना केले. गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवल्यानंतर हा गुन्हा अशोक आढाव यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पिंपळनेर शिवारात पाठलाग करून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
अटकेनंतर त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपीला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मारुती कोळपे, अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सारंग वाघ, प्रकाश बोबडे, राहुल गुंडू आणि नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक कोळपे हे करत आहेत.










