बेलकर, सालके बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना न्याय देतील / राष्ट्रवादी नेते दीपक लंके, पारनेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी घेतला पदभार
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी वर्गाची कामधेनू म्हणून सध्या ओळखली जाऊ लागली आहे. पारनेर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या पिकाला योग्य व दर्जेदार भाव मिळत आहे. येणार्या काळात खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित सभापती गंगाराम बेलकर व उपसभापती संदीप सालके हे बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला न्याय देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दीपक लंके यांनी व्यक्त केला.
खा. नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती म्हणून गंगाराम बेलकर व उपसभापती म्हणून संदीप सालके यांची दि. ११ एप्रिल रोजी निवड करण्यात आली. निवडीनंतर पदग्रहण समारंभ सोमवार दि. २० एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर बाजार समितीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, माजी उपसभापती बापूसाहेब शिर्के, किसनराव सुपेकर, ज्येष्ठ नेते शिवाजी जाधव, मारुती रेपाळे, अशोक कटारिया, रा. या. औटी, शंकर नगरे, विजय पवार, काँग्रेस नेते संभाजी रोहकले, चंदन भळगट, डॉ. बाबासाहेब खोडदे, उद्योजक श्रीरंग रोकडे, शेतकरी नेते महेंद्र पांढरकर, बाबासाहेब नर्हे, सरपंच महेंद्र गायकवाड, दीपक मुळे, बाळासाहेब दिघे, तुकाराम चव्हाण, लखन ठाणगे, सचिव सुरेश आढाव, अरुण बेलकर, आदी पारनेर बाजार समितीचे पदाधिकारी, कर्मचारी, व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकरी यावेळी उपस्थित होते.
लासलगावच्या धर्तीवर पारनेरला ओळख निर्माण करू
पारनेर बाजार समितीमध्ये श्रीगोंदा, नगर तालुका, संगमनेर, जुन्नर या भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा येतो. कांद्याची पठार भागावरील मोठी बाजारपेठ म्हणून सध्या पारनेर बाजार समिती ओळखली जात आहे. येणार्या काळात खा. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील लासलगाव व पिंपळगाव बसवंत या बाजार समितीसारखी पारनेरला ओळख निर्माण करून देऊ.
-गंगाराम बेलकर, सभापती, पारनेर बाजार समिती










