पाथर्डी | नगर सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्घेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांची निवड दर पाच वर्षाला करण्यात यावी. या ट्रस्टचे विश्वस्त हे आजीवन राहणार नाहीत. नवीन विश्वस्त निवडीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती सिध्देश्वर सुंदरराव ठोंबरे यांनी दिले. ग्रामस्थांनी व भाविकांनी या निकालाचे स्वागत केले.
पाथर्डी तालुक्यातील जागृत, पुरातन, व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थांचा गेल्या दहा वर्षापासून विश्वस्तांच्या निवडीवरून वाद होता. या देवस्थानचे विश्वस्त हे आजीवन राहतील, तसेच देवस्थानचे सर्व निर्णय तसेच नवीन विश्वस्त निवडीचे अधिकारही फक्त देवस्थानच्या आजीवन विश्वस्तालाच राहतील, अशी घटनाच वृध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी केलेली होती. याविरुद्ध ग्रामस्थांनी अनेकवेळा आवाज उठविला पण उपयोग झाला नाही. ग्रामस्थांनी अहिल्यानगरच्या धर्मदाय आयुक्ताकडे याविषयी दाद मागितली. तेथे ग्रामस्थांच्या बाजेने निकाल लागला होता. नवीन विश्वस्तांची निवड करण्याचे आदेशही दिले होते.
या निकालाविरोधात देवस्थानच्या विश्वस्तांनी पुणे येथे धर्मादाय आयुक्ताकडे अपील केले होते. तेथेही नगरच्या धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निकाल कायम ठेवला होता. विश्वस्तांच्या बाजूच्या लोकांनी या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. अखेर दि. २१ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिध्देश्वर सुंदरराव ठोंबरे यांनी निकाल दिला. या देवस्थानच्या विश्वस्तांची निवड दर पाच वर्षांनी करण्यात यावी. या देवस्थानच्या विश्वस्तांची निवड करण्याचे अधिकार अहिल्यानगर येथील धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या वतीने अर्जदार हिम्मत पंढरीनाथ पडोळे व एकनाथ पाठक हे वादी होते. या खटल्याचे काम वादीच्या वतीने अॅड. विनायक बेद्रे यांनी तर विश्वस्तांच्या वतीने अॅड.धोर्डे यांनी काम पाहिले.
निकालाची प्रत मिळाल्यावर पुढील निर्णय
न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. त्यामुळे निकालाची प्रत मिळताच वकिलांबरोबर चर्चा करून याविषयी प्रतिक्रिया देऊ. पुढे योग्य तो निर्णय घेऊ.
– गणेश पालवे, अध्यक्ष, वृध्देश्वर देवस्थान
न्यायदेवतेने न्याय दिला
लोकशाहीमध्ये दर पाच वर्षाला नवीन निवड होणे हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. परंतु सदर विश्वस्तांनी आपली स्वतःची मालमत्ताच आहे, असा वापर केला शेवटी कोर्टाने ग्रामस्थांना न्याय दिला
– लक्ष्मण पालवे, माजी सैनिक










