सुरळीत पाणी पुरवठा करा : महापौर ज्योतीताई गाडे | वसंत टेकडी येथे पाहणी करून प्रशासनाला दिल्या सूचना
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात गेल्या एक महिन्यापासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर महापौर ज्योतीताई गाडे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करून सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले.
महापौर ज्योतीताई गाडे यांनी वसंत टेकडी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संबंधित अभियंते व कर्मचार्यांशी चर्चा करत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला. पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
यावेळी अभियंता गणेश गाडळकर यांनी माहिती देताना सांगितले की, मागील महिन्यात वारंवार होणार्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. काही वेळा काही मिनिटे वीज गेल्यानंतरही तीन ते चार तास पाणीपुरवठा विस्कळीत होतो. एका दिवशी तब्बल बारा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्युत विभागाला पत्र देण्यात आले असून, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्यायी उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शहरातील प्रत्येक भागात पाणीपुरवठा नियमित व वेळेवर होण्यासाठी जबाबदार अधिकार्यांनी समन्वयाने काम करावे, असे महापौरांनी सांगितले.या पाहणीवेळी इंजिनिअर गीते,इंजिनिअर ढगे यांच्यासह संबंधित विभागातील कर्मचारी उपस्थित होते. महापौरांच्या या हस्तक्षेपामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










