अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जिल्हा रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाची असलेली ‘एमएलसी’ रेकॉर्ड रूम अज्ञात चोरट्याने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक कैलास काशिनाथ शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास शिंदे हे जिल्हा रुग्णालयाच्या एमएलसी विभागात काम करतात. रुग्णालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स आणि सिटी स्कॅन रूमच्या जवळ असलेल्या खोली क्रमांक २८ मध्ये मागील १५ वर्षांचे न्यायालयीन व पोलीस केस संबंधित जुने रेकॉर्ड ठेवण्यात आलेले आहे. ५ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे रेकॉर्ड रूम व्यवस्थित कुलूप लावून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ९ जून रोजी सकाळी शिंदे हे जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी गेले असता, दरवाजाला आतून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी पाठीमागच्या बाजूला जाऊन पाहिले असता रेकॉर्ड रूमची खिडकी उघडी होती आणि तिचे लोखंडी ग्रील गायब होते. खिडकीतून आत प्रवेश केला असता, खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्याने खोलीतून वर्ष २०२१ ते २०२२ दरम्यानचे ‘एमएलसी ओपीडी क्ष-किरण’ (एक्स-रे) विभागाचे बांधून ठेवलेले २४ महत्त्वाचे गठ्ठे आणि खिडकीचे लोखंडी ग्रील चोरून नेले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लबाडीच्या इराद्याने ही चोरी करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सील तोडून बँकेच्या ताब्यातील घरात घुसखोरी; केडगाव येथील कर्जदारावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: न्यायालयाच्या आदेशाने बँकेने जप्त केलेल्या घराचे सील तोडून, आत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी एका कर्जदाराविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केडगाव येथील मराठा नगर भागातील नाथकृपा रेसीडेन्सीमध्ये घडली आहे.
याप्रकरणी ‘आवास फायनान्शियर्स’ बँकेचे टीम लीडर आकाश अर्जुन गंगणे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कर्जदार आरोपी गणेश अनंतराव उनावणे (रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश उनावणे याने केडगाव येथील आपल्या फ्लॅटवर आवास फायनान्शियर्स बँकेकडून एकूण १५ लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला काही महिने हप्ते भरल्यानंतर त्याने कर्ज फेडणे बंद केले. बँकेने वारंवार मागणी करूनही कर्ज न फेडल्यामुळे, बँकेने अप्पर जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे मालमत्ता जप्तीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार, अधिकार्यांनी २१ जून २०२२ रोजी या घराचा रीतसर ताबा बँकेकडे सोपवला होता आणि घराला सील ठोकले होते.
तेव्हापासून ही मालमत्ता बँकेच्या ताब्यात होती. मात्र, आरोपी गणेश उनावणे याने बँक किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता, घराचे सील आणि कुलूप तोडले. बँकेच्या अधिकृत अधिकाराचे उल्लंघन करून त्याने घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला आणि घराचा ताबा घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
केडगाव औद्योगिक वसाहतीतून अशोक लेलंड ट्रकच्या दोन बॅटऱ्यांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: केडगाव परिसरातील चेट्टिनाड सिमेंट गोदामासमोर पार्क केलेल्या एका मोठ्या १० टायर ट्रकच्या दोन महागड्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राम सर्जेराव सकट (वय ३८, राहणार रेल्वे स्टेशन, भावरी चाळ, अहिल्यानगर) हे गेल्या दोन वर्षांपासून अमोल लड्डा (रा. बार्शी) यांच्या मालकीचा अशोक लेलंड कंपनीचा १० टायर ट्रक (क्रमांक एमएच १५ यु ५१४७) चालक म्हणून चालवतात. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
नेहमीप्रमाणे फिर्यादी राम सकट यांनी ८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा ट्रक केडगाव औद्योगिक क्षेत्रातील चेट्टिनाड सिमेंट गोदामाजवळ पार्क केला होता आणि ते घरी निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता जेव्हा ते ट्रक घेण्यासाठी घटनास्थळी परत आले, तेव्हा त्यांना ट्रकच्या दोन्ही बॅटऱ्या गायब असल्याचे दिसून आले. राम सकट यांनी तातडीने ट्रकच्या आजूबाजूच्या परिसरात आणि संपूर्ण शहरात शोध घेतला, परंतु बॅटऱ्या कुठेही सापडल्या नाहीत.
कोणीतरी अज्ञात आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रकमधून ७ हजार रुपये किमतीच्या दोन पॉवर १०० कंपन्यांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाणे गाठले. तेथे हजर राहून त्यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली आहे. पोलीस अंमलदार यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बँक कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण व खंडणीची मागणी; ६ जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: केडगाव उपनगरात एका बँकेच्या ऑफिस बॉयला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करणे, पैसे व दुचाकी हिसकावून घेणे आणि त्यानंतर जुन्या वादाचा बहाणा करून १ लाख रुपयांची खंडणी मागत जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश साहेबराव पंचमुख (वय ३४, रा. सिद्धार्थ नगर, अहिल्यानगर) हे केडगाव येथील एका बँकेत कंत्राटी पद्धतीवर ऑफिस बॉय म्हणून काम करतात. पहिल्या घटनेत, निलेश हे बँकेच्या कामासाठी दुचाकीवरून जात असताना झेंडा चौक येथे पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरील तिघे जण घसरून पडले. त्यांनी निलेश यांना पकडून बेदम मारहाण केली आणि एका शाळेत नेऊन त्यांचा मोबाईल, रोख दीड हजार रुपये आणि दुचाकी हिसकावून घेतली. नंतर बँक व्यवस्थापकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला व साहित्य परत मिळाले.
मात्र, या घटनेचा राग मनात धरून ९ जून रोजी आरोपी ओंकार दिलीप सातपुते याने निलेश यांना रंगोली चौक येथील आपल्या कार्यालयाजवळ बोलावून घेतले. तेथे ओम किरण बारवकर, अभय कारखेले, अनिकेत शिर्के आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी मिळून निलेश यांना जुन्या अपघातात फुटलेल्या मोबाईलची भरपाई म्हणून १ लाख रुपयांची मागणी केली. निलेश यांनी गरिबीचे कारण सांगून पैसे देण्यास असमर्थता दर्शविली.
यावरून आरोपींनी निलेश यांचे नाव व पत्ता विचारून त्यांना शिवीगाळ केली. तसेच पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची व नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून निलेश पंचमुख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कापूरवाडीत मजुराला दगडाने बेदम मारहाण; जिवे मारण्याची धमकी देत सोन्याची अंगठी लंपास
अहिल्यानगर: कॅम्प पोलीस ठाणे भिंगार अंतर्गत येणाऱ्या कापूरवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ जुन्या वादातून एका मजुराला तिघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी सचिन दिनकर भिंगारदिवे (वय २४, रा. कापूरवाडी) हा तरुण रात्रीच्या वेळी परिसरात असताना, आरोपी सागर कर्डिले (रा. वारुळवाडी) याने अचानक जवळ पडलेला मोठा दगड उचलून सचिनच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.
या हल्ल्यादरम्यान आरोपी प्रवीण ढोबळे (रा. वारुळवाडी) आणि हरिभाऊ माधव भिंगारदिवे (रा. उमापूर, जि. बीड) यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. “तुम्ही जर पुन्हा खणीच्या परिसरात आलात, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी थेट धमकीही या आरोपींनी दिली. या झटापटीत फिर्यादी सचिन यांच्या हातातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घटनास्थळी पडून गहाळ झाली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.
शिराढोण येथे शेताच्या बांधावरून जुना वाद पेटला; एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी गजाने व दगडाने बेदम मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर : अहिल्यानगर जवळील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येथे असणाऱ्या शिराढोण गावामध्ये शेताचा सामायिक बांध कोरल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादात आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून एका ५५ वर्षीय महिलेवर लोखंडी गजाने जबर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये संबंधित महिलेच्या नाकावर गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर घटना सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराशेजारील सामायिक शेतबांधावर घडली. शेताचा बांध कोरल्याचा जाब विचारण्यास गेल्याचा राग मनात धरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी सोबत आणलेल्या लोखंडी गजाने, लाकडी काठ्यांनी आणि दगडांनी थेट हल्ला केला. यावेळी पीडित महिलेला वाचवण्यासाठी तिचे पती आणि मुलगा धावून आले असता, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. आरोपींनी त्या दोघांनाही काठीने आणि दगडांनी बेदम मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिराढोण येथील रहिवासी असलेले आरोपी दत्तात्रय लिबराज वाघ, विजय दत्तात्रय वाघ, विशाल दत्तात्रय वाघ, अजय अशोक वाघ, अभिषेक अशोक वाघ, शंकर हरीभाऊ वाघ आणि रोहन शंकर वाघ या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या भीषण मारहाणीनंतर जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात उपचार घेत असतानाच पीडित महिलेने नगर तालुका पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा रजीस्टर केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वरुळे करत आहेत.
मावा आणि सुगंधी तंबाखू साठा जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर बायजाबाई येथील मगरवस्ती भागात पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक आणि घातक असलेला प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तसेच तयार मावा साठा जप्त केला आहे. हा बेकायदेशीर साठा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या राहत्या घराशेजारील पत्राच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याप्रकरणी आरोपी प्रशांत रामदास मगर (वय ३३ वर्षे, रा. मगरवस्ती, जेऊर बायजाबाई, तालुका व जिल्हा अहिल्यानगर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या महिला अन्नसुरक्षा अधिकारी साजिदा अब्दुल रशिद मुल्ला (वय २७ वर्षे, रा. अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात सुगंधी तंबाखू व मावा उत्पादन आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घातलेली असतानाही या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कारवाईत स्पष्ट झाले.
सदर कारवाई ९ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार टेमकर आणि सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने सुरू आहे.












