मुंबई / नगर सह्याद्री –
रायगडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी जवळ दरड कोसळली. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून गोव्याला जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस आणि वारा जोरदार आहे. सदर दरडीचा काही भाग घरं असलेल्या परिसरात आल्याने त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
वरंधा घाटात दरडी कोसळल्यामुळे सध्या रस्ता रस्ता बंद आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसात वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार ते पाच ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत. सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.
रायगड जिल्हा मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने तात्पुरती मंडणगड – म्हाप्रळ गोरेगाव – माणगाव वाहतूक बंद केली आहे. याठिकाणी पोलिस विभाग, महसूल , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद यांच्या वतीने आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
पेण -खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथील अंबा नदीजवळ अडकलेले १२ कामगार यांना बचाव करत सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई – पुणे ST बस सेवा पूर्णपणे बंद; ५० फेऱ्या रद्द
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून प्रवाशांना अत्यावश्यक कारण नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरड कोसळल्यानंतर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मार्ग सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तातडीने पुणे-मुंबई मार्गावरील सर्व बस फेऱ्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या अंदाजे ५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बससेवा बंद झाल्यामुळे पुणे एसटी स्थानकात अनेक बसेस थांबून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रवाशांनी तिकिटे काढूनही सेवा रद्द झाल्याने काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. दरम्यान, सकाळच्या सत्रात पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या चार एसटी बसेस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या. मार्गावरील परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळताच या बसेस पुढे न पाठवता त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत बोलावण्यात आले.
सर्व प्रवासी आणि चालक-वाहक सुरक्षित असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरड हटविण्याचे आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. मात्र, हवामानाची परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या निकषांचा विचार करूनच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे-मुंबई मार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असल्याने या निर्णयाचा हजारो प्रवाशांवर परिणाम झाला आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासापूर्वी एसटीच्या अधिकृत माहितीनुसारच नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यात गेले काही दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. आज रायगड जिल्ह्यासह नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी काही तासांत अती मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणकोणती शहरं आणि जिल्ह्यात शाळा- कॉलेजला सुट्टी
राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. आजचा दिवस देखील राज्यातील अनेक शहरं आणि जिल्ह्यांसाठी महत्वाचा असणार आहे कारण हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहारासह राज्यातील १३ शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनामार्फत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये, गरज असल्यास त्यांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरीच राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
मुंबई – मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी सोमवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे – पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्णय घेतला. मावळ आणि लोणावळा शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आदेश जारी केले. लोणावळ्यातील अंगणवाडी, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक सर्व शाळांना आज सुट्टी असणार आहे.
उल्हासनगर – प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ६ जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पाणी साचणे व पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज महानगरपालिका हद्दीतील सर्व राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कल्याण डोंबिवली- अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कल्याण- डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने आज महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले आहेत.
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहराला पुराचा धोका वाढला आहे. वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई – नवी मुंबईला देखील आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. या आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
रायगड – रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच अंगणवाड्याना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील २ दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पालघर – पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पालघर जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.










