३१ जणांसह १०० जणांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शासकीय कर्तव्य बजावत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर दगडफेक करून कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना नगर-सोलापूर रोडवरील तूक्कड ओढा येथे घडली. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार येथे ३१ आरोपींसह ७० ते ८० जणांच्या जमावावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालणकर यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना आरोपी योगेश पंडित बेरड याने आपली मोटारसायकल आडवी लावून पोलिसांचे वाहन अडवले. त्यानंतर दीपक बेरड, देविदास बेरड, राजू बेरड, मयूर पुंड आणि धर्मा बेरड यांनी इतर साथीदारांना बोलावून घेतले. दरेवाडी येथील गणेश शिंदे, दीपक उर्फ खेकडा बेरड, राहुल करांडे यांच्यासह मोठ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला.
जमावाने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात फिर्यादी सुनील मालणकर यांच्यासह सपोनि हरीश भोये, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि भगवान धुळे हे जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. आरोपींनी पोलिसांना पुढील तपास करण्यापासून रोखून धरले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३२४(४) आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करत आहेत.
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिला बळजबरीने कुंटणखान्याच्या व्यवसायात ओढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी तिला चुकीच्या कामासाठी प्रवृत्त केले. आरोपी याने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या ताब्यातील गाडीत पीडितेला बळजबरीने बसवून एका फ्लॅटवर नेले. तिथे तिला डांबून ठेवत तिची लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणात एका महिलेने देखील साथ दिल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९६, ९८, ९९, ६४, १४०(४) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विनापरवाना गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त; दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना घरगुती गॅस टाक्यांची साठवणूक आणि अवैध रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुलमोहर रोडवरील पारीजात चौकाजवळ असलेल्या एका पत्र्याच्या गोदामात हा धोकादायक प्रकार सुरू होता. याप्रप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रशांत राम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहानवाज शौकत सय्यद आणि साद अन्वर खान या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साद खान याच्या सांगण्यावरून शहानवाज सय्यद हा कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय घरगुती गॅस टाक्यांमधून गॅस चोरून तो इतर टाक्यांमध्ये भरण्याचे काम करत होता. भरवस्तीत ज्वलनशील पदार्थांची अशा प्रकारे निष्काळजीपणे हाताळणी करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी या छाप्यात ११ हजार रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या १० रिकाम्या आणि १ भरलेली टाकी, २० हजार रुपये किमतीची गॅस भरण्याची इलेक्ट्रिक मोटार यंत्रणा आणि ५ लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत. शहरात अशा प्रकारे अवैध गॅस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भरधाव मोपेडच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; तारकपूर भागातील घटना
अहिल्यानगर: शहरातील तारकपूर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीला भरधाव मोपेडने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मोपेड चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चंदर तोरडे हे दूध घेऊन पायी घरी जात होते. आनंद किराणा दुकानासमोरून रस्ता ओलांडत असताना, डीएसपी चौकाकडून आलेल्या एका दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी तोरडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचा मुलगा सनी शिवाजी तोरडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मोपेड चालक जतीन राजेश उदासी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जतीन उदासी हा सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. अपघातावेळी त्याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगाने चालवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार थोरवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या वेगामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर जादूटोणा
अहिल्यानगर: जमिनीच्या जुन्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धावर जादूटोणा करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील आव्हाडवाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाडवाडी येथील रहिवासी आबासाहेब दगडू आंधळे यांचा आरोपी पोपट एकनाथ पालवे याच्यासोबत जमिनीचा वाद सुरू आहे. याच वादातून गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आंधळे यांच्या घराच्या गेटसमोर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला. आरोपीने स्वतः किंवा इतर व्यक्तीमार्फत फिर्यादीवर जादूटोणा करून त्यांना इजा पोहचवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वृद्धाने तातडीने पोलिसांत धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस हवालदार देवटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा प्रकारांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. अहिल्यानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
किरकोळ वादातून दोन गटात राडा; दगडफेक करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर: मोबाईल खराब झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, अहिल्यानगर तालुक्यातील बहिरवाडी येथे एका कुटुंबाला १२ ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या मुलाने एका व्यक्तीकडून फोन करण्यासाठी मोबाईल घेतला होता. तो मोबाईल खराब झाल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. रागाच्या भरात आरोपी बाळासाहेब दारकुंडे, अमोल दारकुंडे, अमर दारकुंडे, वैभव काळे, वैष्णव काळे, सोमनाथ दारकुंडे, तुषार काळे, दत्तु काळे, कृष्णा काळे, शुभम काळे, सुरज काळे आणि अभिषेक काळे यांच्यासह इतर ४ ते ५ जणांनी फिर्यादीच्या घरावर चाल केली.
या टोळक्याने फिर्यादीचे पती, मुलगा आणि नातेवाईकांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर संतप्त जमावाने फिर्यादीच्या घरावर जोरदार दगडफेक करून दहशत निर्माण केली आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस हवालदार पालवे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
जुना वाद उफाळला; अहिल्यानगरमध्ये महिलेला रॉडने मारहाण, सोन्याचे दागिने लंपास
अहिल्यानगर: तालुक्यातील बहिरवाडी परिसरात जुन्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांसह इतर सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या मुलासोबत झालेल्या वादाचे पर्यावसान या हल्ल्यात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास काळे, दत्तु काळे, दिपक काळे आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन राडा केला. यावेळी आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला चढवत महिलेला जखमी केले. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. गोंधळाचा फायदा घेत एका आरोपीने महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस. च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी चक्रा फिरवली असून लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.










